छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेत आता अरुंधतीचं आयुष्य एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. अनिरुद्धशी घटस्फोट घेतल्यानंतर तीन मुलांची आई असलेल्या अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोष केळकर नावाच्या व्यक्तीची एन्ट्री झाली होती. मात्र, आता आशुतोष केळकरचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा अरुंधती एकटी पडली आहे. या मालिकेत आशुतोषच्या मृत्यूचा सीक्वेन्स नुकताच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी पाहिला. या सीक्वेन्सच्या शूटिंगची देखील जोरदार चर्चा रंगली होती. या दरम्यानच्या कथानकामुळे अरुंधतीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील मोठं वादळ आलं होतं. अरुंधती साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिला या कथानकामुळे ताण आणि नैराश्य आलं होतं.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अरुंधती’ साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. आशुतोष केळकरचा मृत्यू प्रेक्षकांसाठी जितका धक्कादायक होता, तितकाच तो कलाकारांसाठी देखील होता. या सीनचं चित्रीकरण करण्यासाठी अरुंधती अर्थात मधुराणी सतत १० ते १२ दिवस रडत होती. याचा परिणाम तिच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील झाला. रोज बारा तास सतत शूट आणि सलग १०-१२ दिवस रडण्याचे सीन केल्याने मधुराणी प्रभुलकर हिला प्रचंड त्रास झाला होता. या चित्रीकरणादरम्यान तिला सतत औषध घेऊन काम करावे लागत होते.
या गोष्टीचा खुलासा करताना मधुराणी प्रभुलकर म्हणाली की, ‘दिवसातील खूप तास काम करण्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. एक अभिनेत्री म्हणून मला हातच राखून काम करता येत नाही. मी काम करताना त्या भूमिकेत पूर्णपणे शिरते. आता हे चांगलं आहे की वाईट? याबद्दल मला खरंच काही माहित नाही. पण, यामुळे मलाच प्रश्न पडतो की, आपल्याकडे ती एखाद्या पात्रातून बाहेर पडण्याची कला नाहीय का? पण मला वाटतं तीच माझी खासियत आहे. मी अशीच आहे आणि मला असंच काम करता येतं.’
आपल्या आजाराविषयी सांगताना ती म्हणाली की, ‘आशुतोषच्या निधनानंतरचा ट्रॅक होता, तेव्हा मी सलग तीन-चार दिवस दिवसातले तब्बल बारा तास रडत होते. म्हणजे सलग रडण्याचेच सीन्स सुरू होते. यामुळे माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं होतं. एक दिवशी सकाळी मी अलार्म बंद करायला उठले, तेव्हा मला चक्कर आली. त्यानंतर दोन-तीन दिवस मी व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करत होते. मला माहित नव्हतं याला व्हर्टिगो म्हणतात. झोपलं की, मला गरगरायचं. हे सगळं तणावामुळे सुरू झालं होतं. व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन मी तो पूर्ण आठवडाभर काम केलं. आता मी बरी झाले आहे. एखाद्या मालिकेचं काम करताना कलाकारांना भावनांचं व्यवस्थापन करायला वेळ मिळत नाही. तुम्ही सतत भूमिकेत असता. अशावेळी कलाकारांनी छोटे-छोटे ब्रेक घ्यायला हवेत, असं मला वाटतं’.