बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आता सलमान खान त्याचे मुंबईतील घर सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले जात आहे. सलमान खानचा भाऊ अरबाज खानला सलमानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर नुकत्याच झालेल्या गोळीबाराबद्दल विचारण्यात आले. झूमला दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याला विचारण्यात आले की, सलमान आणि त्यांचे कुटुंब जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत का? यावर अरबाज खान म्हणाला की, भाऊ सलमान आणि आमचे वडील, ज्येष्ठ गीतकार सलीम खान, तेथे वर्षानुवर्षे राहतात. त्यामुळे घर सोडल्याने गोष्टी बदलणार नाहीत.
अरबाज खान म्हणाला, ‘तुम्हाला असे वाटते का की, यामुळे धमक्या बंद होतील का? उद्या, तुम्ही राहण्याची जागा बदलाल, तर तुम्हाला वाटते की, ही भविष्यात काही धोका होणार असेल, तर तो दूर होईल? जर तसे झाले असते तर, या गोष्टी केल्या असत्या. पण, वास्तव हे आहे की, तुम्ही किती फिरत राहिलात तरी, सावधगिरी बाळगण्याशिवाय काहीच करू शकत नाही. ते आमचं घर आहे. सलमान आणि आमचे बाबा वर्षानुवर्षे तिथे राहतात. ते घर रिकामी करा, मग आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, असं कुणी म्हणत नाहीये. तसं असतं तर आम्ही घर सोडण्याचा विचार केला असता.’
अरबाज खान पुढे म्हणाला की, ‘म्हणून, आता आम्ही एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी खबरदारी घेणे. आम्ही वैयक्तिकरित्या घेऊच, शिवाय सरकार देखील यात लक्ष घालत आहे. या सगळ्यात आम्ही शक्य तितके सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. सतत धमकी किंवा जीवानिशी मारण्याची भीती बाळगून आम्ही घराबाहेर पडणं तर बंद करू शकत नाही ना?’
१४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सलमान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर बंदुकीच्या चार गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले की दोन्ही आरोपींनी टोप्या घातलेल्या आणि बॅकपॅक लावल्या होत्या. सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या मूळ गावातील पाच जणांना मुंबई पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी मुंबई गुन्हे शाखेने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याविरुद्ध सबळ पुरावे जप्त केले होते. सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात अनमोल आणि लॉरेन्सही आरोपी आहेत.
संबंधित बातम्या