‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये आता एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. सायली अर्जुनला रोमँटिक डेटवर घेऊन गेली आहे. मात्र, या डेट दरम्यान आता सायली आणि अर्जुनचा अपघात होणार आहे. सायली स्कुटी चालवत असताना, मागून आलेला एक बाईकस्वार सायलीला धक्का मारून निघून जात असताना, सायली आणि अर्जुन स्कूटीवरून खाली पडणार आहेत. यावेळी सायली थोडीशी जखमी होणार आहे. तर, बाईकस्वार थांबून सायलीची माफी मागणार आहे. यानंतर सायली मात्र गाडी चालवायला घाबरणार आहे. परंतु, अर्जुन तीच मनोबल वाढवताना दिसणार आहे.
इकडे सुभेदारांच्या घरी अश्विन आणि प्रताप दोघेही मिळून घरातल्या महिला मंडळींसाठी खास पदार्थ बनवत आहेत. आज आपण आपल्या घरातील महिलावर्गाला तवा पुलाव आणि पावभाजी द्यावी, असा त्यांचा बेत असतो. हे दोन्ही पदार्थ पूर्णा आजी आणि कल्पना यांच्या प्रचंड आवडीचे आहेत. म्हणूनच या पदार्थांचा बेत या दोघांनी मांडलेला असतो. अश्विन घरातील सगळ्या महिला मंडळाला बोलावून आणतो आणि सर्वांत जेवण वाढतो. आजच्या दिवशी ते अगदी विमललाही काम करू देत नाहीत. तिलाही सर्वांसोबत जेवायला बसवतात. तर, या खास क्षणीदेखील अर्जुन आणि सायली आपल्या सोबत नाही, तर ते बाहेर मजा करत आहेत, असं म्हणत अस्मिता या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करते.
दुसरीकडे, अर्जुन आनंदात असल्याने सायली देखील सुखावून गेली आहे. मात्र, अर्जुन आनंदी झाल्याने आपल्याला का आनंद झालाय, याचा उलगडा तिला होत नाहीये. खरंच मधुभाऊ म्हणतात त्याप्रमाणे आपण अर्जुनच्या प्रेमात पडलोय की काय? असं सायलीला वाटू लागतं. इतक्यात अर्जुन आणि सायली घरी परततात आणि अश्विन-प्रतापला स्वयंपाक घरात काम करताना पाहून आश्चर्यचकित होतात. इतकंच नाही, तर दोघेही या घरच्या पार्टीत सहभागी होतात. एकीकडे पंधरा मिनिटाच्या डेट वरून येताना झालेल्या अपघातात सायलीला जखम झालेली असते. मात्र, ती कुणाला सांगत नाही. घरी गेल्यावर अर्जुन सायलीला आपल्या जखमांवर मलम लावताना पाहणार आहे. मात्र, सायलीचा हात पोहोचत नसल्याने, आता अर्जुन सायलीच्या जखमावर फुंकर मारून त्यावर मलम लावताना दिसणार आहे. एकंदरीतच मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे रोमँटिक वळण पाहायला मिळणार आहे.
दुसरीकडे, नागराज आणि रविराज यांच्या घरात मोठा ड्रामा सुरू आहे. प्रियाने रविराजचे कान भरल्यामुळे आता रविराजसमोर नागराजचा खरा चेहरा आला आहे. प्रियाला एकटीला सगळी प्रॉपर्टी हवी असल्याने ती नागराज विरोधातील सगळे पुरावे दाखवते. नागराज हा महिपतचा माणूस असून, त्याला मदत करत असल्याचे देखील ती रविराजला सांगते. त्यामुळे रविराज नागराजवर प्रचंड संतापलेला असतो. तो नागराजला घराबाहेर काढणारच असतो की, सुमन त्याचे पाय धरून माफी मागते आणि एकदा आपल्या नवऱ्याला माफ करा, असं म्हणते. सुमनच्या डोळ्यातील अश्रू न बघवल्याने रविराज नागराजला माफ करतो. मात्र, ही त्याला दिलेली शेवटची संधी आहे, असं म्हणत त्याला घरात राहण्याची परवानगी देतो.
संबंधित बातम्या