छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह नुकतीच दीपक चौहानसोबत लग्न बंधनात अडकली आहे. नुकतेच या जोडप्याच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळी आरती सिंह लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसली होती. या लेहेंग्यात तिचा लूक अगदीच पाहण्यासारखा होता. आरतीचा ब्रायडल लूक पाहून सगळेच तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तर, आरतीचा मामा गोविंदा याने लग्नाला हजेरी लावत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या येण्याने आता आरती आणि कृष्णा अभिषेक या भावंडांसह सगळेच खूप खुश झाले आहेत.
आरती सिंहच्या लग्नात ज्या व्यक्तीची सर्वजण वाट पाहत होते, ती व्यक्ती होती अभिनेत्रीचा मामा म्हणजेच अभिनेता गोविंदा. अखेर अभिनेता गोविंदा याने आपले मामा होण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. गोविंदाने आरती सिंहच्या लग्नात मोठ्या आनंदाने प्रवेश केला. गोविंदा नेहमीप्रमाणेच काळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
दुसरीकडे, अभिनेता कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह आरतीच्या लग्नात मामा गोविंदा येण्याची बराच वेळ वाट पाहत होते. हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभाला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण, मामा आला नाही. मात्र, गोविंदाने आपल्या भाचीच्या लग्नात भव्य एन्ट्री करून सर्वांना आश्चर्यचकित केले. गोविंदाच्या येण्यामुळे कृष्णा आणि कश्मिराच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. यावेळी पापाराझींशी संवाद साधताना, मामाचे लग्नाला उपस्थित राहण्याचे क्षण अतिशय खास असल्याचे सांगितले.
पापाराझींशी संवाद साधताना कृष्णा अभिषेक म्हणाला की, मामाच्या येण्यामुळे आम्ही सगळेच खूप आनंदी झालो आहोत. आम्ही मामाच्या पाया पडून त्याचे आभार मानले. तर, कश्मिराने बोलताना सांगितले की, गोविंदा मामाने त्यांच्या दोन्ही मुलांची भेट घेतली आणि त्यांना आशीर्वाद दिला. यामुळे ती देखील खूप खूश आहे. कृष्णाच्या दोन मुलांच्या जन्मादरम्यान कुटुंबात मोठा वाद झाला होता. भांडणानंतर, कृष्णाने आपल्या दोन मुलांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक वेळा आपल्या मामा आणि मामीना बोलावले. परंतु, वाद इतका वाढला की, कोणीही कोणालाही भेटू शकले नाही. आता आरतीचे लग्न कुटुंबासाठी शुभ ठरले आहे आणि गोविंदाने कृष्णा-काश्मिराच्या दोन मुलांची पहिल्यांदा भेट घेतली आणि त्यांना आशीर्वाद दिला आहे.
संबंधित बातम्या