‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम जहागीरदार, साळुंकेची चांगलीच धुलाई करताना दिसणार आहे. अभिराम आणि लीला यांचा साखरपुडा झाला आहे, हे कळल्यावर आता साळुंके चांगला चवताळला आहे. त्याने कालिंदीकडे दिलेले पैसे आणि दागिने यासोबतच लीलासाठी पाठवलेल्या सगळा साड्या पुन्हा परत मागितल्या आहेत. यासाठी तो कालिंदीला धमकावणार देखील आहे. ‘मी आता लीला आणि अभिरामचं लग्न मोडणार’, अशी धमकी देऊन साळुंकेने कालिंदीला भीती घातली आहे. तर, ‘माझ्या मुलीचं लग्न मोडू नका. तुम्ही सांगाल, ते मी करेन’, असं म्हणत कालिंदी त्याला सगळ्या वस्तू परत करण्यासाठी तयार होणार आहे.
‘मी दोन वाजता तुम्हाला मेसेज करेन, पाठवलेल्या पत्त्यावर माझ्या सगळ्या वस्तू घेऊन या’, असं म्हणून साळुंकेने लीलाच्या घरातून काढता पाय घेतला खरा मात्र आता त्याच्या डोक्यात एक वेगळा प्लॅन शिजत आहे. आता साळुंके थेट त्याच्या मसाल्यांच्या फॅक्टरीमध्ये पोहोचणार आहे. इकडे अभिरामच्या घरी एका नवीन डीलवर बोलणं सुरू आहे. मात्र, त्याच्या पुढ्यात आलेले टेस्टिंगचे मसाले पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की, हे आपल्या कंपनीचे मसाले नाहीत, हे भेसळयुक्त मसाले आहेत. त्यामुळे अभिराम ते डील थांबवतो आणि या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, हे शोधण्याचा प्रयत्न करत थेट साळुंकेच्या कारखान्यात जाऊन पोहोचतो.
वेश बदलून आलेला अभिराम आता साळुंकेच्या कारखान्यात नक्की काय चालू आहे, याकडे लक्ष ठेवतो. दुसरीकडे, साळुंकेने कालिंदीला देखील याच कारखान्यात सामान घेऊन बोलवले आहे. कालिंदी कारखान्यात पोहोचल्यावर साळुंके तिला लीला देखील आताच्या आता इथे बोलावून घे, असं सांगणार आहे. लीला इथे आली की, तिला पुन्हा जाऊ देणार नाही, तिला किडनॅप करून तिच्याशी ताबडतोब लग्न करणार, असा साळुंकेचा प्लॅन आहे. मात्र, त्याआधीच अभिराम तिथे पोहोचणार आहे. अभिरामच्या कंपनीचं प्रॉडक्ट असलेल्या मसाल्यांमध्ये साळुंके भेसळ करतोय, हे समोर आल्यानंतर अभिराम संतापून साळुंकेला मारणार आहे. चिडलेला अभिराम, साळुंखेची चांगलीच धुलाई करणार आहे.
मात्र, साळुंके आता त्याच्या पुढ्यात एक मोठा बॉम्ब फोडणार आहे. आधीच अभिराम चिडलेला असताना साळुंके त्याला म्हणणार आहे की, ‘तू माझ्या आयुष्यात ढवळढवळ करतोयस, ती चालते का? ज्या लीलाशी तू साखरपुडा केलाय, तिचं माझ्याशी लग्न ठरलंय आणि आमच्या लग्नाची तयारी सुरू आहे. तिच्या बापाकडे माझं कर्ज आहे. आणि त्या बदल्यात तिच्याशी लग्न लावून देण्याचा शब्द तिच्या आईने मला दिला. त्याच्यात आता तू ढवळढवळ करतोयस.’ साळुंकेकडून हे ऐकल्यानंतर आता अभिराम पुढे काय करणार, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.