मुंबई इंडियन्स हा आयपीएल २०२४ मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. पाचवेळचा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय त्यांच्यावर उलटला आहे. यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून येणारी बातमी चाहत्यांसाठी अस्वस्थ करणारी आहे. मुंबई इंडियन्सच्या वरिष्ठ सदस्यांनी कर्णधार हार्दिक पंड्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्याचे समोर आले आहे.
एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, खेळाडू आणि कोचिंग स्टाफमध्ये एका सामन्यानंतर मीटिंग झाली. या बैठकीत संघाचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश होता. दुपारच्या जेवणादरम्यान त्यांनी आपले मत मांडले आणि संघाची चांगली कामगिरी न होण्याची कारणे निदर्शनास आणून दिली. नंतर काही वरिष्ठ खेळाडू आणि टीम मॅनेजमेंट प्रतिनिधींमध्ये वन टू वन चर्चा झाल्याचीही माहिती मिळते आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर हार्दिक पंड्याने तिलक वर्माला पराभवास जबाबदार धरले होते. त्या सामन्यात तिलक सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पंड्या म्हणाला होता, की 'जेव्हा अक्षर पटेल गोलंदाजी करत होता, तेव्हा तिलकने त्याला टार्गेट करायचा हवे होते. मला वाटतं की तिथेच आपण चुकलो, त्याला खेळाची थोडी जाणीव असायला हवी. शेवटी, आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली".
दरम्यान, दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे हार्दिकच्या कर्णधारपदाचे अपयश नाही. तर संघ १० वर्षांपासून रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळला आहे. त्यामुळे अचानक झालेल्या नेतृत्व बदलाशी जुळवून घेताना थोडी अडचण येत आहे. हे खेळात नेहमीच घडते".
या हंगामात एमआयमध्ये काहीतरी गडबड असल्याचेही क्रिकेट तज्ज्ञांनी म्हटले आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कने असेही म्हटले की मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी दोन गटांमध्ये विभागलेली दिसते. क्लार्कच्या मते, 'मला वाटते की त्या चेंजिंग रूममध्ये वेगवेगळे गट आहेत. हे गट एकत्र जुळत नाहीत, ते एक संघ म्हणून खेळत नाहीत".