इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पडत आहे. या हंगामात संघांनी ३० पेक्षा जास्त डावांमध्ये २०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सनराझर्स हैदराबादने या लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. SRH ने RCB विरुद्ध २८७ धावा केल्या होत्या.
विशेषत: ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक सलामीमुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. एक काळ असा होता की आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत ख्रिस गेल आणि इतर परदेशी खेळाडू अव्वल स्थानांवर असायचे. पण आयपीएल २०२४ मध्ये एका भारतीय खेळाडूने षटकारांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
लखनौ आणि हैदराबाद सामन्यापूर्वी केकेआरचा सुनील नरेन हा यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणार फलंदाज होता. केकेआरचा झंझावाती सलामीवीर नरेनने आतापर्यंत ११ सामन्यात ३२ षटकार ठोकले आहेत.
पण लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने २८ चेंडूत ७५ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात त्याने ६ षटकार मारले. यासह अभिषेक आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. अभिषेकच्या नावावर आता १२ सामन्यांमध्ये ३५ षटकार आहेत.
जर आपण IPL २०२४ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-५ फलंदाजांबद्दल बोललो तर त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. अभिषेक शर्मा ३५ षटकारांसह अव्वल तर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग पाचव्या स्थानावर आहे. परागने आतापर्यंत ११ सामन्यात २८ षटकार मारले आहेत. सुनील नरेन ३२ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांच्या नावावर ३१ षटकार आहेत.
IPL २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज प्रत्ये सामन्यात वादळ आणत आहेत. SRH एका मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा संघ बनला आहे. यापूर्वी एकाच मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सीएसकेच्या नावावर होता, त्यांच्या खेळाडूंनी २०१८ मध्ये १४५ षटकार मारले होते. आता हैदराबादच्या खेळाडूंनी आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १४६ षटकार मारले आहेत.