Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants : आयपीएल २०२४ च्या ५७ व्या सामन्यात (८ मे) सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा १० गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लखनौने प्रथम खेळताना १६५ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात हे लक्ष्य गाठण्यासाठी हैदराबादच्या फलंदाजांनी १० षटकेही घेतली नाहीत.
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात ९.४ षटकात १६७ धावांची भागीदारी झाली. ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूंत ८९ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने ८ चौकार आणि ८ षटकार मारले.
तर दुसरीकडे, अभिषेक शर्माने अवघ्या २८ चेंडूत ७५ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. या दोघांनी पहिल्याच षटकापासून स्फोटक पद्धतीने षटकार आणि चौकार मारण्यास सुरुवात केली. हैदराबादने हा सामना ६२ चेंडू राखून आणि १० विकेट्स राखून जिंकल्यामुळे, लखनौच्या नेट रनेरटवर खूप वाईट परिणाम झाला आहे.
दरम्यान, या सामन्यानंतर लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका हे चांगलेच संतापलेले दिसले. ते संघाचा कर्णधार केएल राहुल आणि हेड कोच जस्टीन लँगर यांना खडसावताना दिसले. गोएंका यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता.
लखनौ-हैदराबाद सामन्यानंतर लखनौ, दिल्ली आणि सीएसके समान १२ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत लखनौची अवस्था खूपच वाईट झाली आहे.
परिस्थितीत केएल राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. आता सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे एलएसजी फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका संतापले आणि त्यांच्या संतापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लखनौचा असा लाजिरवाणा पराभव झाल्याने संजीव गोयंका यांची खूप निराशा झाली. संघाच्या कामगिरीवर ते खूश नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
दरम्यान, संजीव गोएंका यांनी सर्वांसमोर केएल राहुलची खरडपट्टी काढल्याने क्रिकेट चाहत्यांनी गोएंका यांना ट्रोल केले आहे.
‘केएल राहुल हा उच्च श्रेणीचा खेळाडू आहे आणि त्याच्यासोबत भर मैदानात अशी वागणूक योग्य नाही. संजीव यांनी वैयक्तिकरित्या कोणत्याही खोलीत किंवा ड्रेसिंग रूममध्ये जाऊन केएल राहुलकडे आपली नाराजी व्यक्त करू शकले असते. पण भर मैदानात अशी वागणूक चांगली नाही", असे क्रिकेट चाहत्यांचे मत आहे’.
सध्या चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या तिन्ही संघांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. पण खराब नेट रन-रेटमुळे एलएसजी सहाव्या स्थानावर आहे. लखनौला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर त्यांना पुढील दोन सामन्यांमध्ये दिल्ली आणि मुंबईला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल.