इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ५८ व्या सामन्यात आज (९ मे) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आहेत. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २४१ धावांचा डोंगर उभारला आहे. पंजाबला विजयासाठी २४२ धावा कराव्या लागणार आहेत.
या सामन्यात१० षटकांनंतर जोरदार पाऊस झाला आणि मैदानावर गाराही पडल्या. मात्र काही वेळाने पुन्हा सामना सुरू झाला. यानंतर विराट कोहलीच्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आणि त्याने ४७ चेंडूत ९२ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. याशिवाय रजत पाटीदारने २३ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार मारले.
त्याचवेळी कॅमेरून ग्रीनने शेवटच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन केले. कॅमेरून ग्रीनने २७ चेंडूत ४६ धावा केल्या. या अष्टपैलू खेळाडूने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तर ७ चेंडूत १८ धावा करून दिनेश कार्तिक पॅव्हेलियनमध्ये परतला.
पंजाब किंग्जच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षल पटेलने ४ षटकांत ३८ धावांत ३ फलंदाज बाद केले. विद्वथ कावरेप्पा यांना २ विकेट मिळाले. याशिवाय अर्शदीप सिंगने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली. तर कर्णधार सॅम करनने रजत पाटीदारला बाद केले.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खराब झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस ७ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. यानंतर विल जॅक ७ चेंडूत १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दोन फलंदाज ४३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्यात ७६ धावांची चांगली भागीदारी झाली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ११ सामन्यांत ८ गुण आहेत. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तर पंजाब किंग्ज ११ सामन्यांत ८ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. अशा प्रकारे हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या आहेत.
संबंधित बातम्या