CM Shinde Meet Salman Khan : आम्ही बिश्नोई गँगचा खात्मा करू; सलमान खानच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM Shinde Meet Salman Khan : आम्ही बिश्नोई गँगचा खात्मा करू; सलमान खानच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं आश्वासन

CM Shinde Meet Salman Khan : आम्ही बिश्नोई गँगचा खात्मा करू; सलमान खानच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं आश्वासन

Apr 16, 2024 10:24 PM IST

CM Eknath Shinde Meet Salman Khan : हे महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, येथे कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही बिश्नोई गँग खतम करू, असे आश्वान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान व कुटूंबीयांची भेट घेतल्यानंतर दिले.

सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Cm Eknath shinde reaction after meet salman khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्याघराबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनेता सलमान खानची वांद्रेतील त्याच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. सलमानच्या घरासमोर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पकडण्यात आलेले आरोपी बिश्नोई गँगचे आहेत. याआधीही बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ही मुंबई आहे. आम्ही बिश्नोई गँग खतम करु. येथे कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी सलमान खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. त्याला दिलासा दिला. सरकार सलमान खानच्या व त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. सलमानची व त्याच्या कुटूंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. या हल्ल्यानंतर मी पोलीस आयुक्तांना तातडीने सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दोन्ही आरोपींना सोमवारी अटक केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, हे महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, येथे कुठलीही गँग नाही. मुंबईतील संपूर्ण अंडरवर्ल्ड संपलं आहे. आम्ही बिश्नोईला खतम करु. अशी हिंमत कोणीही करणार नाही. येथे मुंबई पोलीस आहेत. येथे कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही. कोणत्याही नागरिकाला जर कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर खपवून घेतलं जाणार नाही. सलमान खान तर खूप मोठा फिल्मस्टार आहे. त्याच्या कुटुंबाची जाबाबदारी आमची आहे. अशी कुणाचीही गँग इथे चालणार नाही. त्यांची गँग आम्ही मुंबई महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्यांना पकडलंय त्यांचा तपास सुरु आहे. मूळापर्यंत तपास होईल. जो जो आरोपी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आरोपींची नावं सांगितली -

मुख्यमंत्री म्हणाले मी सलमान खानची भेट घेऊन इथे आलो आहे. ही सदिच्छा भेट होती. येथे फायरिंग झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पोलिसांनी गुजरात राज्यातील भुजमधून विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली आहे. ते मूळचे बिहारमधील चंपारण येथील आहेत. न्यायालयाने आरोपींना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर