Salman Khan Firing Case update : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला होता. या प्रकरणानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी गेल्या २४ तासात तपासाची सूत्रे वेगाने फिरवून अनेक संशयितांना अटक केली आहे. हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून काल रायगड येथून तिघांना अटक केल्यावर रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातच्या भुज येतून आणखी दोघांना अटक केली आहे. या दोघांननी हा हल्ला घडून आणल्याची माहीती आहे. या आरोपींना मुंबई येथे आणण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री गुजरातमधील भुज येथून दोन आरोपींना अटक केली या दोघांना लवकरच मुंबईत आणून दोन्ही आरोपींची चौकशी केली जाणार आहे. तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने रविवारी सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. याबाबतही पोलीसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , 'गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली आहे.' दोन्ही आरोपींना चौकशीसाठी मुंबईत आणले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका दिवसात दोन्ही आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील अनेक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून आरोपींची ओळख पटवली. गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकावर खंडणी, खून या सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमकी दिली होती, त्यानंतर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत जीवे मारण्याची धमकी देणारे फोन, ईमेल आणि पत्रेही आली होती. आता गुन्हे शाखेने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.