सांगली लोकसभा मतदारसंघातील तिढा सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळण्याला जिल्ह्यातील जुना संघर्ष कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याला माहिती होते. त्याचाच फटका आता विशाल पाटलांना बसला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना विशाल पाटील म्हणाले, ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वसंतदादा आणि राजाराम बापू यांच्यातील वाद मिटला आहे.
सोमवारी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी म्हटले की, शेतकऱ्याच्या मुलाने खासदार होऊ नये असे वाटत असेल किंवा माझ्या उमेदवारीची अडचण झाली असेल तर मी माझी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे. यावर विशाल पाटील म्हणाले की, शेतकऱ्याच्या मुलाने खासदार, आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा राजकीय बळी देऊ नये, असे प्रत्युत्तर विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना दिले आहे.
विशाल पाटील म्हणाले मी स्वार्थासाठी लढत नाही. ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वसंतदादा आणि राजाराम बापू वाद मिटला, असे म्हणत विशाल पाटील यांनीनिवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे. हे काँग्रेसचे बंड आहे, आमचे काँग्रेसवर प्रेम कायम रहाणार चिन्ह नेले आमच्याकडून तर वेगळ्या चिन्हावर निवडून येऊ आता माघार घ्यायची नाही. सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटलांनी काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
विशाल पाटील म्हणाले की, सांगलीची जागा काँग्रेसच्या हातून निसटल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आपण अर्ज भरला पाहिजे असा कार्यकर्त्यांचाआग्रह होता. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने सांगलीबाबत खूप मोठी चूक केली. भाजपला हरवायचं असेल तरयेथे सक्षम उमेदवार द्यायला हवा होता. कार्यकर्त्यांनी हीच मागणी पक्षाकडे केली होती. ३८ हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केली. आपण उमेदवारी दाखल केली पाहिजे, असा त्यांचा सूर होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान सांगलीच्या जागेवरील पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार विश्वजित कदमसुद्धा उपस्थित होते. महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे, अशा सूचना वरिष्ठांनी सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
संबंधित बातम्या