मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election : दक्षिण मुंबईत भाजपचं मराठी कार्ड; राहुल नार्वेकर लोकसभा लढणार! काय आहे रणनीती?

Lok Sabha Election : दक्षिण मुंबईत भाजपचं मराठी कार्ड; राहुल नार्वेकर लोकसभा लढणार! काय आहे रणनीती?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 29, 2024 04:18 PM IST

South Mumbai Lok Sabha Election : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं समजतं.

Arvind Sawant vs Rahul Narwekar in South Mumbai
Arvind Sawant vs Rahul Narwekar in South Mumbai

Arvind Sawant Vs Rahul Narwekar : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असल्यामुळं आता प्रमुख राजकीय पक्षांचे पत्ते उघड होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं महायुतीपुढं आव्हान असेल. त्यामुळंच सर्व बाजूंचा विचार करून बलाढ्य उमेदवार ठरवले जात आहेत. दक्षिण मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदाराला टक्कर देण्यासाठी भाजपनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवण्याचं निश्चित केल्याचं समजतं.

ट्रेंडिंग न्यूज

आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकायच्या असा निर्धार भाजपनं केला आहे. हे लक्ष्य गाठायचं असेल तर उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य आहे. मात्र, इथं महाविकास आघाडीकडून महायुतीला जोरदार टक्कर मिळणार आहे. विशेषत: पक्ष फुटल्यामुळं दुखावलेली ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी महायुतीला पराभवाची धूळ चारण्याच्या त्वेषानं मैदानात उतरेल. हे आव्हान परतावून लावण्यासाठी भाजपनं तगडे उमेदवार रिंगणात उतरवल्याचं ठरवलं आहे.

दक्षिण मुंबई हा मुंबईतील संमिश्र वस्ती असलेला मतदारसंघ आहे. मराठी, गुजराती आणि मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेल्या या मतदारसंघात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. सावंत हे उत्तम लोकसंपर्क असलेले लो-प्रोफाइल कामगार नेते आहेत. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. मागील दहा वर्षांपासून खासदार असलेल्या सावंत यांचा मतदारसंघात जम बसला आहे. त्यांना टक्कर द्यायची असेल तर तितकाच तगडा उमेदवार दिला पाहिजे हे हेरून भाजपनं नार्वेकर यांना मैदानात उतरवण्याचं ठरवल्याचं समजतं.

राहुल नार्वेकर विद्यमान आमदार

राहुल नार्वेकर हे मराठी आहेत. मध्यमवर्गीयांबरोबरच उच्चभ्रू मतदारांशीही ते कनेक्ट होऊ शकतात. कुलाबा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत. त्याचाही त्यांना फायदा मिळू शकतो, असा भाजपचा होरा आहे.

मनसेची मतं वळविण्याची खेळी

ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी निवडणूक मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईत अमराठी उमेदवार फारसा उपयोगाचा ठरणार नाही. सध्या भाजपशी मधुर संबंध साधून असलेल्या मनसेच्या मतदारांची मतं भाजपकडं वळवायची असली तर मराठी उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही, हे भाजप जाणून आहे. त्यामुळं नार्वेकर यांची निवड करण्यात आल्याचं समजतं.

बांधबंदिस्ती करण्याचा प्रयत्न

भाजपकडून ही जागा जिंकण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नसल्याचं समजतं. त्यामुळंच येथील काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांच्याशी भाजपकडून सध्या जवळीक साधली जात आहे. अमीन पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा अलीकडं होती. अद्याप तसं काही नसलं तरी भाजपकडून निवडणुकीत त्यांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel