अजय महाराज बारस्कर यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. जरांगे पाटील नाटकी माणूस असून सरकारसोबत गुप्त बैठका करत असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांना आता मराठा बांधवांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अजय बारस्कर यांच्यावर आज मुबंईत हल्ल्याचा प्रयत्न झाला.
राज्य सरकारने मराठ्यांना १० टक्के आरक्षण दिल्यानंतर अजय बारस्कर यांनी जरांगे यांच्याविरोधात आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी बारस्कर यांची प्रहार संघटनेतून हकालपट्टी केली होती. आता बारस्कर यांच्या विरोधात जरांगे समर्थक मराठा बांधव आक्रमक होत असून आज (शुक्रवार) मुंबईत प्रवास करत असताना चर्चगेट परिसरामध्ये बारस्कर यांच्यावर काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती स्वत: त्यांनीच दिली आहे.
त्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ५ ते ६ हल्लेखोरांना अडवत ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर बारस्कर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बारस्कर आज पत्रकार परिषदेत घेणार होते. त्यापूर्वीच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आहे.
अजय बारस्कर यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुकाराम महाराज व सरकारच्या आडून अजय बारसकर मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. हा सरकारचा ट्रॅप असून बारस्कर भोंदू महाराज आहे. सरकारने बारस्कर यांना हाताशी धरून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.
संबंधित बातम्या