Manoj Jarange Patil: मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात मंजूर केले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा आरक्षणाची मागणी केली होती. पण, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तसेच सगे सोयरेची मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत आजपासून दररोज दोन तास रास्ता रोको करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सरकारने मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण न दिल्यास आजपासून महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले आहे. मराठा समाजाच्यावतीने त्यांच्या गावात ‘रास्ता रोको’ मोहीम राबवण्यात येत आहे. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार सकल मराठा समाजातर्फे अहमदनगर शहरातील तीन ठिकाणी आज सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अहमदनगरात केडगाव वेशी समोर, एमआयडीसीतील सह्याद्री चौक व भिंगार देशी जवळ अशा तीन ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होणार आहे. राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाची वेळ बदलली आहे.
- आमच्या लोकांच्या घरी एकही नेता येणार नाही आणि मराठा आंदोलनात सहभागी असणारेही त्यांच्या घरी जाणार नाहीत.
- मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक न घेण्याची विनंती. निवडणुका झाल्यास प्रचाराची वाहने जप्त करून निवडणुकीनंतर परत केली जातील.
- ०१ मार्चपासून जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजातील वृद्ध उपोषणाला बसणार आहेत. त्यांना काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारची असेल.
- ०३ मार्च रोजी संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांत 'रास्ता रोको' मोहीम राबविण्यात येणार आहे. हे आंदोलन रात्री १० ते ०१ वाजेपर्यंत चालणार आहे.
- ०३ मार्चला मुंबईला जायचे की नाही? याबाबत निर्णय घेतला जाईल.