ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव लिखित ‘आमचा बाप आन् आम्ही’ या आत्मकथनपर पुस्तकाची २०० वी आवृत्ती लवकरच प्रकाशित केली जाणार आहे. मराठीतील पहिले ‘इंटरनॅशनल बेस्ट सेलर’ ठरलेल्या या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी मुंबईत राजभवन येथे समारंभात करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली.
‘आमचा बाप आन् आम्ही’ हे ज्येष्ठ अर्थतज्ञ, रिझर्व बँकेचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार, राज्यसभेचे माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजित चळवळीतून प्रेरणा घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांच्या संघर्षाची कहाणी पुस्तकात मांडली गेली आहे. ‘आमचा बाप आन् आम्ही’ या पुस्तकात चार पिढीची कहाणी मांडण्यात आली आहे. २०० वी मराठी आवृत्ती प्रकाशित होणारे हे मराठी साहित्याच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक ठरले आहे. या पुस्तकाच्या आजपर्यंत २ लाख प्रतींहून अधिक विक्री झालेली आहे. बोलीभाषा, शैली, आशावादी जीवनदृष्टी या वैशिष्ट्यांमुळे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे.
‘आमचा बाप आन् आम्ही’ या पुस्तकाचे हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, उर्दू, कोंकणी, पंजाबी, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, थाई आणि कोरियनसह एकूण १४ भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. कोरियन भाषेत हे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे. सर्व भाषांमध्ये मिळून आतापर्यंत एकूण साडे सात लाख प्रतींची विक्री झाली आहे.
पुस्तकाचे लेखक डॉ. नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ असून ते माजी राज्यसभा सदस्य आहेत. डॉ. जाधव हे रिझर्व बँकेचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य म्हणून कार्य केले आहे. त्यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये विविध विषयांवर ४० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत.
दरम्यान, ‘भीमभाष्य’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे २५ पैलू उलगडून दाखविणाऱ्या पॅाडकास्ट सिरीजचीही सांगता त्याच दिवशी होणार आहे. सुमारे २० मिनिटांचा एक असे एकूण ५४ एपिसोडस् मराठी, हिन्दी आणि इंग्लिश या तीन भाषांत ‘Dr NarendraJadhav World’ या यू ट्युब चॅनल वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
हेही वाचाः