Pune news- पुणे बुक फेस्टिव्हल वादात भोवऱ्यात; JNUबद्दल उल्लेख असलेल्या पुस्तकावरील चर्चा केली रद्द
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune news- पुणे बुक फेस्टिव्हल वादात भोवऱ्यात; JNUबद्दल उल्लेख असलेल्या पुस्तकावरील चर्चा केली रद्द

Pune news- पुणे बुक फेस्टिव्हल वादात भोवऱ्यात; JNUबद्दल उल्लेख असलेल्या पुस्तकावरील चर्चा केली रद्द

Updated Dec 21, 2023 06:09 PM IST

Pune Book Festival - पुण्यातील साधना प्रकाशनाच्या ‘पक्षी उन्हाचा - सात विद्यापीठांच्या आवारात’ या पुस्तकावर नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे आयोजित पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेली चर्चा अचानक रद्द करण्यात आली आहे.

Pune Book Festival organizers cancel discussion on Marathi book
Pune Book Festival organizers cancel discussion on Marathi book

पुण्याच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ डिसेंबरपासून सुरु असलेला ‘पुणे बुक फेस्टिवल’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या फेस्टिवलमध्ये साधना प्रकाशनाच्या, राजन हर्षे लिखित ‘पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात’ या पुस्तकावर आज, गुरुवारी आयोजित केलेली चर्चा रद्द करण्यात आल्याचे बुक फेस्टिवलचे आयोजक नॅशनल बुक ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. या घटनेबाबत पुण्यातील साप्ताहिक साधना व साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी एक सविस्तर पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ते लिहितात, ‘१६ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात पुस्तक व लेखक यांच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास प्रस्ताव द्यावा, असे पत्र नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) ने ५ डिसेंबर रोजी अन्य अनेक प्रकाशकांसह साधना प्रकाशनालाही पाठवले होते. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी साधना प्रकाशनाने, राजन हर्षे लिखित ‘पक्षी उन्हाचा’ या नव्या पुस्तकावरील चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला उत्तर देताना, या संदर्भात आमच्या प्रतिनिधी आकांक्षा बिष्णोई यांच्या संपर्कात राहावे, असे एनबीटीने कळवले होते. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊसवर साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी आकांक्षा व त्यांच्या सहकारी निहारिका यांची भेट घेतली होती. तेव्हा सुहास पाटील, गोपाळ नेवे व साईनाथ जाधव हे साधनाचे तीन सहकारीही उपस्थित होते. त्या भेटीतच आकांक्षा व निहारिका यांनी महोत्सवाचे वेळापत्रक पाहून, २१ डिसेंबर दुपारी २ ते ३ ही एक तासाची वेळ निश्चित केली होती.

लेखक डॉ. राजन हर्षे हे फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी असल्याने आणि कार्यक्रमाला येणारा वाचक समूह लक्षात घेऊन फर्ग्युसनचे अँफी थियेटर हे स्थळही कार्यक्रमासाठी तेव्हाच त्यांनी निश्चित केले होते. कार्यक्रमाचे पाहुणे व स्वरुप कळविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे, चर्चेचे स्वरूप व वक्त्यांची नावे त्यांना दुसऱ्या दिवशी कळवण्यात आली होती. अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेले लेखक डॉ राजन हर्षे, नांदेड येथील स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर , मुंबई विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉ सतीश बागल हे चौघे या पुस्तकावर चर्चा करणारे होते. डॉ संकल्प गुर्जर हे या चर्चेचे संचलन करणार होते. कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी साधनाचे सुहास व सुदाम हे दोन सहकारी आकांक्षा यांना भेटले तेव्हा त्यांना कार्यक्रमाचे स्थळही (अँफी थियेटर ऐवजी बुक कट्टा ) त्यांनी दाखवले होते. मात्र कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता आकांक्षा बिष्णोई यांनी साधना चे संपादक विनोद शिरसाठ यांना फोन करून कळवले की, महोत्सवाच्या ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार असल्याने तुमचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे. या पुस्तकाचा विषय, कार्यक्रमाला येणारे निमंत्रित वक्ते आणि साधना प्रकाशनाचा पाऊण शतकाचा वारसा हे सर्व लक्षात घेता, कार्यक्रम रद्द झाल्याचे असे ऐनवेळी सांगणे योग्य नाही, असे साधनाच्या संपादकांनी आकांक्षा यांना सांगितले. तेव्हा, वरिष्ठांशी बोलून थोड्या वेळाने फोन करून सांगते, असे त्या म्हणाल्या. मात्र अर्धा तासाने फोन करून त्यांनी, कार्यक्रम रद्दच करावा लागत आहे असे कळवले.’

दरम्यान, नॅशनल बुक ट्रस्टच्याया निर्णयाचा आम्ही निषेध करीत असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले. हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तरीसर्व वक्त्यांची वेळ व हॉलची उपलब्धता हे सर्व काल रात्री ठरवले असून, तेच सर्व वक्ते घेऊन तो कार्यक्रम शुक्रवार २२ डिसेंबर २०२३ रोजी, सकाळी १०.३० वाजता, टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पार पडणार आहे, अशी माहितीही शिरसाठ यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर