मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाकरेंची शिवसेना चोरीला गेलीय, ती कुणाच्या घरात आहे हे लवकरच कळेल; जयंत पाटलांचा भाजपला टोला

ठाकरेंची शिवसेना चोरीला गेलीय, ती कुणाच्या घरात आहे हे लवकरच कळेल; जयंत पाटलांचा भाजपला टोला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 12, 2022 12:01 PM IST

Jayant Patil On BJP : शिवसेना फोडल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यामुळं आता भाजप आणि राष्ट्रवादीत राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Jayant Patil vs Devendra Fadnavis
Jayant Patil vs Devendra Fadnavis (HT)

Jayant Patil vs Devendra Fadnavis : शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटाला आता नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टी सत्तेशिवाय फार काळ राहू शकत नाही. त्यामुळंच भाजपच्या नेत्यांनी पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली. परंतु आता त्याचं खापर राष्ट्रवादीवर फोडलं जातंय. हिंदुत्वाची मतं जातील आणि आपल्याला सत्ता मिळणार नाही, या भीतीनंच भाजपनं शिवसेना फोडल्याचं पाप केल्याचं सांगत जयंत पाटलांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राज्यातील सर्व शिवसेनेच्या आमदारांसोबत चांगले संबंध आहेत. आमचे नेते शरद पवारांनी भाजपला दूर ठेवण्यासाठीच महाविकास आघाडीचा प्रयोग केला. परंतु आता उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कुणाच्या घरात आहे, हे लवकरच कळेल, असं म्हणत पाटलांनी भाजपला टोला लगावला आहे.

शिवसेना फोडण्यात भाजपचाच हात- पाटील

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे भाजपप्रणित होतं. त्यामुळं भाजपनंच शिवसेना फोडल्याचं स्पष्ट होतंय. शिवसेनेच्या आमदारांना साम, दाम, दंड, भेद वापरुन फोडणे योग्य आहे का? असा जयंत पाटलांनी उपस्थित केला. आगामी अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतून जनतेच्या मताची चाचणी होणार असून शिंदे-फडणवीस हे शिवसेनेचा उमेदवार पळवण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी सर्वांचं एकमत हवं- जयंत पाटील

राज्यात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची गरज असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. कारण आता रस्ते, वीज, पाणी आणि नैसर्गिक संसाधनं कमी पडू लागली आहेत. परंतु लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करताना त्याला सर्वसहमती असणं आवश्यक असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

IPL_Entry_Point