Mumbai Police: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा बुधवारी (०१ मे २०२४) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत पोलीस हवालदार मुंबई पोलिसांच्या वरळी लोकल आर्म्स डिव्हिजन-३ मध्ये कार्यरत होते. दरम्यान, २८ एप्रिल २०२४ रोजी माटुंगाजवळील रेल्वे रुळांवर फटका गँगने मयत पोलीस हवालदाराला विषारी इंजेक्शन टोचल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे.
दादर गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पवार (वय, २०) असे विषारी इंजेक्शनमुळे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. विशाल हे सोमवारी (२८ एप्रिल) मुंबई लोकलने ड्युटीसाठी जात होते. माटुंगा आणि सायन स्थानकांदरम्यान विशाल हे फोनवर बोलत असताना फटका गँगच्या एका सदस्याने त्यांच्या हातावर फटका मारला. यामुळे त्यांच्या हातातील फोन निसटून खाली पडला. यानंतर हा फोन घेऊन फटका गँगने पळ काढला. लोकलचा वेग कमी असल्याने विशाल यांनी खाली उतरून फटका गँगचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर फटका गँगने विशाल यांना घेरले आणि धक्काबुक्की केली. विशाल यांनी प्रतिकार केला असता फटका गँगने त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन टोचले. तसेच त्यांच्या तोंडात लाल रंगाचे द्रव ओतले. सोमवारी ९.३० वाजताच्या सुमारा ही घटना घडली.
यानंतर विशाल जमीनीवर कोसळले. दुसऱ्या दिवशी शुद्दीवर आल्यानंतर विशाल घरी परतले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या कुटुंबाने त्यांना सोमवारी ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पवार यांची प्रकृती खालावली आणि बुधवारी त्यांचा मृत्यू झाला, असे मध्य रेल्वेचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
स्थानिक कोपरी पोलीस स्टेशनने त्यांचे जबाब नोंदवून भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२ (दरोडा), ३९४ (लुटताना दुखापत करणे), ३२८ (विषारी द्रव्य प्राशन करून इजा करणे) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हे प्रकरण कोपरी पोलीस ठाण्यातून दादर जीआरपीकडे वर्ग करण्यात आले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या