बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आले. यापैकी अनुज थापन (वय, २३) याने बुधवारी क्रॉफर्ड मार्केटजवळील मुंबई पोलिस मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
सलमान खान गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ११ जणांना अटक केली. ज्यात अनुज थापन ऊर्फ अनुजकुमार ओमप्रकाश थापन याचा समावेश होता. या सर्व आरोपींना मुंबई पोलिस मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, थापन दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वच्छतागृहात गेला. काही वेळ तो परत न आल्याने काही कैदी त्याची तपासणी करण्यासाठी गेले असता तो शौचालयाच्या खिडकीच्या ग्रीलला लटकलेल्या अवस्थेत आढळला. थापनला तातडीने जवळच्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात येणार असून राज्य सीआयडी या मृत्यूचा तपास करणार आहे.
मुंबई पोलिसांनी लागू केलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मोक्का) कडक कलमांमुळे थापन मंगळवारी रात्रीपासून या प्रकरणात अडकण्याची चिंता करत होता आणि त्याला तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही, अशी भीती वाटत होती. गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या नेतृत्वाखालील संघटित गुन्हेगारी टोळीचे सदस्य असलेल्या संशयितांवर गुन्हे शाखेने मोक्का लावला आहे.
अनुज थापन आणि त्याचा साथीदार सोनू सुभाष चंदर ऊर्फ सोनूकुमार बिश्नोई यांनी १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत वापरलेली शस्त्रे आणि दारुगोळा पुरवल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
अनमोल बिश्नोईने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती येथील तुरुंगात आहे. दोन दिवसांनंतर गुन्हे शाखेने विक्की कुमार गुप्ता (२५) आणि सागर कुमार पाल (२४) या दोन कथित हल्लेखोरांना गुजरातमधील कच्छ येथून अटक केली. थापन आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी २६ एप्रिल रोजी पंजाबमधून अटक केली होती.
ट्रक क्लिनर म्हणून काम करणारा थापन हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीसाठी काम करत होता आणि बॉसच्या सांगण्यावरून त्याने शस्त्रे पुरवली होती, असा दावा पोलिसांनी केला आहे. गुन्हे शाखेने तापी नदीतून हल्लेखोरांनी बाळगलेली दोन्ही पिस्तुले आणि हल्लेखोरांना देण्यात आलेल्या ३८ पैकी १७ जिवंत गोळ्या असलेली चार मॅगझिन जप्त केली.
संबंधित बातम्या