IMD Heatwave Alert : भारतीय हवामान खात्यानं मुंबईसह महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यासह मुंबई शहरातील काही भागांत २७ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यापैकी २७ आणि २८ एप्रिलला उष्णतेचा झळा अधिक जाणवतील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी आज पत्रकारांना याबाबत माहिती दिली. 'उष्णतेची लाट अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशनमुळं आहे. या प्रक्रियेमुळं ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागात पारा वरच्या दिशेनं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
मैदानी भागात किमान ४० अंश सेल्सिअस, किनारपट्टीभागात ३७ अंश सेल्सिअस आणि डोंगराळ भागात ३० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचल्यास उष्णतेची लाट आली असं अधिकृतपणे म्हटलं जातं.
आर्थिक राजधानी मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी एप्रिल महिन्यात जारी करण्यात आलेला हा दुसरा उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. १५ आणि १६ एप्रिल रोजी मुंबई आणि नवी मुंबईत काही ठिकाणी तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत गेलं होतं, त्यामुळं तीव्र उष्ण हवामानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.
उष्ण हवामानात दीर्घकाळ राहणं टाळा.
पुरेसं पाणी प्या आणि शरीरातील ओलावा कायम राखा.
हलक्या रंगाचे, सैल, सूती कपडे परिधान करा.
दुपारच्या वेळेत बाहेर पडताना डोकं झाकून घ्या किंवा ओले कपडे, टोपी किंवा छत्री वापरा.
कष्टाची कामं दिवसातील जास्तीत जास्त थंड वेळेत करा.
देशभरात उष्णतेच्या दिवसांमध्ये वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागानं २१ एप्रिल रोजी व्यक्त केला होता. एप्रिलमध्ये सर्वसाधारणपणे एक ते तीन दिवस अति उष्णतेचे असतात. यावेळी ते चार ते आठ दिवस असतील असा अंदाज आहे.
एप्रिल ते जून या संपूर्ण कालावधीत १० ते २० दिवस उष्णतेची लाट येऊ शकते आणि काही भागात २० दिवसांपेक्षा जास्त उष्णतेची लाट येऊ शकते. आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, ओडिशा आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाचं म्हणणं आहे.
तीव्र उष्णतेमुळं पॉवर ग्रीडला धोका निर्माण होण्याची शक्यता असून देशाच्या विविध भागांत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शिवाय, मान्सूनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्राला अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे, कारण वर्षाच्या अखेरीस 'ला नीना'ची स्थिती अपेक्षित आहे.