Maharashtra Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. आज राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणात आणि मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा यवतमाळ येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रीय स्थिती म्हणजे सायकल आणि सर्कुलेशन हे मराठवाडा व लगतच्या विदर्भावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही छत्तीसगड ते दक्षिण केरळपर्यंत आहे. ही द्रोणीका रेषा मराठवाडा व लगतच्या विदर्भावर असलेल्या चक्रीय स्थिती मधून जात आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस कोकण वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील पाच दिवस वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये २५ एप्रिलला वातावरण उष्ण व दमट राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आज परभणी व हिंगोलीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात आज अमरावती नागपूर वर्धा व यवतमाळ येथे मेघगर्जना व विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह गारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका राहणार आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उद्या नागपूर वर्धा यवतमाळ येथे मेघ गर्जना व वीजांचा कडकडाटासह वादळी वारा आणि गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघ गर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी कही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरात आज पासून २५ एप्रिल पर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २६ व २७ एप्रिलला आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे.
संबंधित बातम्या