मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain Update: विदर्भासह मराठवाड्याला मुसळधार पावसानं झोडपलं; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वीजांचा कडकडाट

Rain Update: विदर्भासह मराठवाड्याला मुसळधार पावसानं झोडपलं; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वीजांचा कडकडाट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 07, 2023 06:32 PM IST

Maharashtra Rain Update : हवामान खात्यानं इशारा दिल्यानंतर काही तासांतच राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.

Vidarbha And Marathwada Rain Update
Vidarbha And Marathwada Rain Update (HT)

Vidarbha And Marathwada Rain Update : ऐन उन्हाळ्यात राज्यातील हवामान अचानक बदलल्याने राज्यातील अनेक भागांत आज दुपारी दमदार पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भातील बुलढाणा, अमरावती आणि अकोल्यात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळ्यात सोसाट्यांच्या वारा सुटला असून त्याला शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दुपारी तीन वाजता हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्यांच्या वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या तीन आठवड्यांपासून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांचं तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहचलं होतं. परंतु गेल्या २४ तासांच्या आत राज्यातील हवामान अचानक बदललं. आज सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने झपाट्याने उष्णता कमी झाली. दुपारनंतर सोसाट्याचा वारा सुटून पावसानं हजेरी लावली. विदर्भातील अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. बुलढाण्यातील खामगाव आणि चिखली तालुक्यांमध्ये रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरासह गंगापूर आणि पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाल्यामुळं शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्यातील तीन जिल्ह्यांत गारपीटीचा इशारा....

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं आता गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या अवकाळी पावसानं राज्यात पुन्हा हजेरी लावल्यामुळं बळीराजा संकटात सापडण्याची चिन्हं आहेत.

IPL_Entry_Point