मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Unauthorized School : मान्यता नसताना सुरू होत्या शाळा; पुण्यातील या संस्थांवर कारवाईचे आदेश

Unauthorized School : मान्यता नसताना सुरू होत्या शाळा; पुण्यातील या संस्थांवर कारवाईचे आदेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 16, 2023 07:36 PM IST

Unauthorized School In Pune : शासनाची मान्यता नसतानाही पुण्यात अनेक खाजगी शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Unauthorized School In Pune Dist
Unauthorized School In Pune Dist (HT)

Unauthorized School In Pune Dist : शासनाची मान्यता नसतानादेखील अनधिकृतपणे अनेक शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं आता विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनानं प्रकरणात तातडीनं कारवाईचे आदेश काढले आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल १३ अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या शाळांविरोधात कारवाई होण्याची शक्यता असून यामध्ये पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातील या शाळांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्याच्या काळात पुणे शहरासह जिल्ह्यातील झेडपी शाळांसह खासगी इंग्रजी माध्यमांच्या किती शाळा सुरू आहेत, याची माहिती शाळांनी शिक्षण विभागांना देणे अपेक्षित आहे. परंतु काही शाळांनी याची माहितीच शिक्षण विभागाला दिलेली नाही. त्यानंतर संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेची तपासणी केली असता त्यांना शाळा अनधिकृतरित्या सुरू असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर आता प्रशासनानं शाळांच्या संस्थाचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारची अद्याप परवानगी नाही. तरीही या शाळांनी वर्ग सुरु केले असून त्या शाळांमध्ये विद्यार्थी शिकत आहेत.

कोणत्या परिसरातील शाळांवर होणार कारवाई?

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणीकाळभोर, आंबेगाव बुद्रुक आणि मुळशी तालुक्यातील उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे-सागवडे, दत्तवाडी या परिसरातील शाळांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय दौंड तालुक्यातील कासुर्डी, लिंगाळी रोडसह पुरंदरमधील वीर येथील इंग्रजी शाळेचा समावेश असल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यातील १३ अनिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. तसेच सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना अनधिकृत शाळांची तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानंतर आता कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली आहे.

IPL_Entry_Point