मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raigad : रायगडावर पिंडदान केल्यावरून वाद पेटला; संभाजीराजेचं मुख्यमंत्र्यांना पत्र, कारवाईची मागणी

Raigad : रायगडावर पिंडदान केल्यावरून वाद पेटला; संभाजीराजेचं मुख्यमंत्र्यांना पत्र, कारवाईची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 26, 2022 01:28 PM IST

Raigad Fort : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच पिंडदानाचा कार्यक्रम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं वाद पेटला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Samadhi Raigad Fort
Chhatrapati Shivaji Maharaj Samadhi Raigad Fort (HT)

Chhatrapati Shivaji Maharaj Samadhi Raigad Fort : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच पिंडदानाचा कार्यक्रम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं आता शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेडनं दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या प्रकरणात कारवाई करण्याची आणि गडावर अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर विधीसाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संभीजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र...

या प्रकरणानंतर आता दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, रायगडवर छत्रपती महाराजांच्या समाधीस्थळी गेल्या काही महिन्यांत काही लोकांनी संशयास्पद विधी केल्याचं आढळून आलं आहे. या लोकांना अटकाव घालण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्यात याव्यात, अशा प्रकारांमुळं शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून हे प्रकार पुन्हा होणार नाहीत, यासाठी गृहविभाग व केंद्रीय पुरातत्व विभागास आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

रायगडावर संभाजी ब्रिगेडनं शनिवारी शाक्त पद्धतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. या कार्यक्रमाला ब्रिगेडच्या राज्यभरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर ते ब्रिगेडचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी गडावर गेले असता त्यांना तिथं काही लोक पिंडदान करत असल्याचं लक्षात आलं. समाधीस्थळावर पिठाचे गोळे, फुले आणि इतर साहित्‍य पाहून शिवभक्तांनी पिंडदान करणाऱ्या लोकांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु तिथं उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

पुरातत्‍व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, संभाजी ब्रिगेडची मागणी

रायगड आणि शिवसमाधी परिसरात नेहमीच पोलिसांचा बंदोबस्त असतो. याशिवाय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा परिसर आहे. त्यामुळं पोलिंसाच्या उपस्थितीत हा प्रकार घडतोच कसा?, पोलीस आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संमतीनंच हा प्रकार घडला असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडनंही या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

IPL_Entry_Point