Congress questions Devendra Fadnavis : 'माझा बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे, पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत, असं थेट आव्हान भाजपचे आमदार नीतेश राणे देतात. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? ती हिम्मत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.
राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून आमदार नीतेश राणे हे वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं देताना चिथावणीखोर भाषा वापरत आहेत. पोलीसही आपलं काही बिघडवू शकत नाहीत असं म्हणत आहेत. त्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी संताप व्यक्त केला आहे.
‘कटकारस्थान करून महाविकास आघाडीचं सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भाजपचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे, हातपाय तोडू, डोळे काढू, अशी भाषा करतो.
सोलापूरच्या सभेत या आमदार नितेश राणेंनी भडकाऊ भाषण दिलं म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण कारवाई काहीच झाली नाही. अकोल्यातील सभेतही आमदार नितेश राणेनी गरळ ओकली. 'पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, व्हिडिओ काढतील आणि स्वतःच्या बायकोला दाखवतील, मी इथं आलो तर तुम्हाला कायदा सुव्यवस्था सांभाळणं मुश्कील होईल. ही भाषा महिलांचा अपमान करणारी व थेट पोलिसांना आव्हान देणारी आहे, असं लोंढे म्हणाले.
'भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नितेश राणेंची ही भाषा मान्य आहे का? सत्ताधारी आमदार हे काय कायद्यापेक्षा मोठे आहेत का? या गुंडाछाप दोन कवडीच्या आमदारावर कारवाई करताना शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या हाताला लकवा मारतो का? आमदार नितेश राणेंच्या भाषणावर भाजपनं भूमिका स्पष्ट करावी व त्यांना आवर घालण्याची हिम्मत दाखवावी, असं आव्हान अतुल लोंढे यांनी सरकारला दिलं.
भडकाऊ भाषण देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत परंतु भाजपच्या राज्यात कायदा तर धाब्यावर बसवला आहेच पण कोर्टालाही ते जुमानत नाहीत, हा सत्तेचा माज आहे. आमदार नितेश राणेवर कारवाई करू नये म्हणून पोलिसांवर दबाव आहे हे आम्हाला माहीत आहे मग पोलिसांच्या लाठ्या व कायदा हा फक्त विरोधकांवर का उगारता? कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पोलिसांनी लक्षात घ्यावे. सरकार येतात व जातात परंतु पोलीस व प्रशासनानं त्यांचं कर्तव्य चोख बजावलं पाहिजे. “म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो” हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असंही लोंढे यांनी सुनावलं.