लोकसभा निवडणुका जवळ येताच महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चासुरू असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तसेच एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत सामील होणार असल्याचा खळबळजनक दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान मोदी व राज्यातील महायुतीच्या विरोधातील चेहरे म्हणून उद्धव ठाकरे व शरद पवार यांना पाहिले जाते. मात्र आता उद्धव ठाकरेच मोदींना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य राणा यांनी केले आहे. रवी राणा म्हणाले की, शिवसेना फुटल्यापासूनउद्धव ठाकरे बैचेन आहेत. त्यांना कधी मोदीजींचं दर्शन घेतो आणि माफी मागतो,असे झाले आहे. उद्धव ठाकरे काही लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील. याबाबत मातोश्रीवर मंथन सुरू असल्याचा दावाही रवी राणा यांनी केला आहे.
दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष भाजपच्या गोटात सामील होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी याबाबत खुलासा करत यासर्व अफवा असल्याचं म्हटले आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, जयंत पाटील मोठे नेते आहेत. मात्र ते माझ्या तरी संपर्कात नाहीत. कोणाला भाजपमध्ये यायचे असेल तर त्यांचे मी स्वागतच करतो.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे की, महविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. आपल्या राजकीय भवितव्याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळे सर्वजण आपल्यासाठी योग्य पर्याय शोधत आहेत. याबाबत मला जास्त काही बोलायचं नाही, मात्र येत्या १५ ते २० दिवसांत राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी होतील, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.
संबंधित बातम्या