Supriya Sule taunt BJP : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठा नेता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपला सणसणीत टोला हाणला आहे. ‘भाजपकडं इतकी ताकद असूनही त्यांना आमच्याकडचे लोक हवेसे वाटत असतील तर काही तरी दम आहे ना,’ असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ‘जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्याबद्दल दररोज चर्चा असतात. भाजपकडं २०० आमदार आणि ३०० खासदार एवढी मोठी ताकद आहे, तरीही त्यांना आमचे लोक हवे आहेत. याचा अर्थ आमच्यात काही तरी गंमत आहे ना, काही तरी टॅलेंट आहे. त्याशिवाय एवढी ताकद असताना कुणी असं करणार नाही. आमच्यासारखे छोटे पक्षही त्यांना हवे आहेत म्हणजे काही तरी दम आहे ना,’ असा प्रतिसवाल सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'भाजपमध्ये किती अहंकार आहे. हेच भाजपचे संस्कार आहेत का? मी भाजपला फार जवळून पाहिलं आहे. अटल बिहारी वाजपेयीपासून ते सुषमा स्वराजपर्यंत अनेक मोठे नेते आम्ही पाहिले आहेत, पण त्या नेत्यांमध्ये अहंकार नव्हता. आताचा भाजप अहंकाराची भाषा करतो याचं मला आश्चर्य वाटतं. एका सुसंस्कृत पक्षाचं आज काय झालं आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
'भाजपनं पक्ष फोडले आणि घरं फोडली. आता राज ठाकरेंना भेटायला चालले आहेत म्हणजे भाजपनं पक्ष फोडण्याचं राजकारण केलं आणि विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला तरीही निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास त्यांना वाटत नाही. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यात पुणे, नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. वाढती गुन्हेगारी हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. मी राजीनामा मागितला की माझ्यावर टीका केली जाते. परंतु, राज्याचं गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडं आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळं अमित शाह यांनी गृहमंत्रालयाचं ऑडिट करणे गरजेचं आहे, अशी मागणी सुळे यांनी केली.
संबंधित बातम्या