मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrakant Handore : काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर; महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना संधी

Chandrakant Handore : काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर; महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना संधी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 14, 2024 01:20 PM IST

Chandrakant Handore for Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.

Chandrakant Handore
Chandrakant Handore

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची नावं जाहीर केली असून महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या हंडोरे यांच्यावर पक्षानं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेसनं आज राज्यसभेसाठी चार उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात खुद्द पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांचा समावेश आहे. सोनिया गांधी राजस्थानमधून अर्ज दाखल करणार आहेत. त्याशिवाय, अखिलेश प्रसाद सिंह यांना बिहारमधून आणि अभिषेक मनु सिंघवी यांना हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. तर, चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे.

चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसची पसंती का?

चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे माजी महापौर आणि राज्याचे माजी मंत्री आहेत. काँग्रेसमधील एक प्रमुख दलित चेहरा अशी त्यांची ओळख आहे. ते भीम शक्ती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. हंडोरे यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनं मुंबईतील दलित मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. हंडोरे हे खासदार झाल्यास आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो असाही पक्षाचा होरा आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीतही हंडोरे यांना संधी दिली होती. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते भाई जगताप हे देखील रिंगणात होते. मात्र, त्यावेळी महाविकास आघाडीची मतं फुटल्यानं हंडोरे पराभूत झाले होते. पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळं त्यांच्या समर्थकांमध्ये व दलित समाजात नाराजीची भावना होती. हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केल्याचं बोललं जात आहे.

राज्यसभेत निवडून येण्याचंही आव्हान

राज्यसभेची उमेदवारी हंडोरे यांना मिळाली असली तरी त्याचा मार्ग खडतर आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे तर, काँग्रेसमधील काही आमदार भाजपवासी झाले आहेत. सध्या काँग्रेसमध्ये असूनही भाजपच्या वाटेवर असलेले आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता आहे. त्यामुळं निवडून जाण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा मिळवण्यासाठी हंडोरे यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.

IPL_Entry_Point