मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP Congress Merger : काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा विषयच नाही; शरद पवारांच्या पक्षाकडून स्पष्टीकरण

NCP Congress Merger : काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा विषयच नाही; शरद पवारांच्या पक्षाकडून स्पष्टीकरण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 14, 2024 12:27 PM IST

NCP (SP) and Congress merger News : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बातमीवर पक्षाच्या नेत्यांनी खुलासा केला आहे.

Rahul Gandhi and NCP founder Sharad Pawar
Rahul Gandhi and NCP founder Sharad Pawar (PTI)

NCP Congress merger News : 'शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याची चर्चा आमदार शशिकांत शिंदे यांनी फेटाळून लावली आहे. ही केवळ अफवा आहे आणि ती कुणी पसरवली याचा शोध पत्रकारांनी घ्यावा,' असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष व त्या पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यामुळं शरद पवार यांच्या पक्षापुढं सध्या अनेक आव्हानं आहेत. आगामी निवडणुकांना कोणत्या चिन्हावर सामोरं जायचं हा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज पक्षाचे आमदार, खासदार व नेत्यांची बैठक होत आहे.

ही बैठक सुरू होण्याआधीच पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या टीव्ही वाहिन्यांवर झळकू लागल्या होत्या. त्यावर माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी खुलासा केला आहे. ‘विलिनीकरणाचा विषयच नाही. या बातम्या पेरल्या जात आहेत. त्या कोण पेरत आहेत त्याचा शोध पत्रकारांनीच घ्यावा,’ असं शशिकांत शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ‘आजची बैठक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आहे. राज्यात पुढील काळात इंडिया आघाडीच्या सभा होणार आहेत. त्या सभांचं नियोजन बैठकीत केलं जाणार आहे. शिवाय पक्षाचं नवं चिन्ह आणि नव्या नावावरही चर्चा होत आहे. या पलीकडं कुठलाही विषय नाही. ज्यांना पवार साहेबांची अ‍ॅलर्जी आहेत ते लोक विलिनीकरणाच्या अफवा पसरवत आहेत. त्यात काही तथ्य नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पक्षाच्या विलिनीकरणाचा कुठलाही विचार नव्हता, नाही आणि नसेल,’ असं जगताप म्हणाले.

कशी सुरू झाली चर्चा?

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर सर्व प्रमुख नेते शरद पवार यांना भेटले आणि जवळपास दीड तास चर्चा केली. याच भेटीत चेन्नीथला यांनी शरद पवार यांच्यासमोर एकाच चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचं बोललं जात आहे. हा प्रस्ताव केवळ निवडणूक लढण्यापुरता होता की थेट विलिनीकरणाचा होता यावर मतमतांतरं आहेत. मात्र, त्यावरून विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. त्यातच आज पवार गटाची बैठक होत असल्यानं त्यात भर पडली.

IPL_Entry_Point

विभाग