मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune Expressway : मंत्री संदिपान भुमरेंच्या मावस भावाचा कार अपघातात मृत्यू, पैठणमध्ये शोककळा

Mumbai Pune Expressway : मंत्री संदिपान भुमरेंच्या मावस भावाचा कार अपघातात मृत्यू, पैठणमध्ये शोककळा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 19, 2022 11:46 AM IST

Accident On Mumbai Pune Expressway : काही महिन्यांपूर्वीच मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात विनायक मेटेंचं निधन झालं होतं. त्यानंतर आता रोहयो मंत्री संदीपान भुमरेंच्या मावस भावाचं कार अपघातात निधन झालं आहे.

Car Accident On Mumbai Pune Expressway
Car Accident On Mumbai Pune Expressway (HT)

Car Accident On Mumbai Pune Expressway : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्या मावस भावाचं मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या कार अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर आता मंत्री संदीपान भुमरेंचे मावस भाऊ अंबादास नरवडे यांचं कार अपघातात निधन झाल्यानं मुंबई-पुणे महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आहे. याशिवाय नरवडे यांच्या मृत्यूनं संपूर्ण पैठण तालुक्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे मावस भाऊ अंबादास नरवडे हे मुंबईतून पुण्याच्या दिशेनं निघाले असता त्यांची कार एका टेम्पोला मागून जोरात धडकली. या अपघातात कारचा चुराडा झाल्यानं नरवडे यांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर काही तरी जोराचा आवाज झाल्यानं स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कारला रस्त्याच्या बाजूला करत रुग्णावाहिका बोलावली. परंतु तोपर्यंत नरवडे यांचा मृत्यू झालेला होता.

पाचोड परिसरात होती मोठी ताकद...

अंबादास नरवडे हे पैठणमधील प्रतिष्ठीत पाचोड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. तालुक्यातील शिवसेनेचे ते नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अपघाती निधनामुळं पाचोडसह पैठणमध्ये शोककळा पसरली असून मंत्री संदीपान भुमरे यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

IPL_Entry_Point