मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri Bypoll : निवडणूक अंधेरीत आणि प्रचार संपूर्ण मुंबईत; बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी

Andheri Bypoll : निवडणूक अंधेरीत आणि प्रचार संपूर्ण मुंबईत; बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 19, 2022 10:48 AM IST

Andheri Bypoll 2022 : भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही सहा उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यामुळं मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

Former Maharashtra chief minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray
Former Maharashtra chief minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray (HT_PRINT)

Andheri Bypoll 2022 : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतलेली असली तरी अंधेरीत येत्या तीन नोव्हेंबरला मतदान होणार आहे. कारण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यानं शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड झाली नाही. त्यानंतर आता अंधेरीतील निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मोठं प्लॅनिंग केलं आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं केवळ अंधेरीतच नाही तर संपूर्ण मुंबईत घरोघरी मशाल चिन्ह पोहचवण्यासाठी शिवसेनेनं मोहीम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना शिवसेनेकडून मुंबईत लोकांना उटण्याच्या पाकिटातून मशाल हे चिन्ह घरोघरी पोहचवण्यात येत आहे. याशिवाय दिवाळीच्या सणानिमित्तानं लोकांमध्ये जास्तीत जास्त जाऊन शिवसेनेच्या चिन्हाचा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर या स्वत: दिवाळीच्या सणावर मतदारांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचं समजतं.

शिवसेनेकडून निघणार मशाल यात्रा...

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आणि चिन्ह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेकडून मशाल यात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा मुंबईतील अनेक भागांमधून जाणार असून ही यात्रा केवळ अंधेरी पूर्व विधानसभेच्या प्रचारापुरतीच मर्यादित राहणार नाही. संपूर्ण मुंबईत शिवसेनेकडून मशाल यात्रेचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे.

अंधेरीसह मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पूर्वतयारी...

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर शिंदे गटानं शिवसेनेवर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकला होता. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर निर्णय घेत आयोगानं शिवसेनेचं चिन्ह गोठवत दोन्ही गटांनी नवीन चिन्ह बहाल केलं. त्यानंतर राज्यात ही पहिलीच निवडणूक होत असल्यानं मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. याशिवाय आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्यानंही शिवसेना मशाल हे चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.

IPL_Entry_Point