Bus Fire News: लग्नाचे वऱ्हाड मुंबईहून सोलापूरला जात असताना बसला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग लागली. आज मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस अक्षरक्ष: जळून खाक झाली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४२ जणांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त बस लग्नाचे वऱ्हाड घेऊन मुंबईहून सोलापूरच्या दिशेने जात होते. मात्र, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने लगेच बसमधील सगळ्यांना खाली उतरण्यास सांगितले. काही क्षणातच बसने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्ण जळून खाक झाली. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. ही आग कशामुळे लागली अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या आगीच्या घटनेने वाहतुकीवर परिणाम झाला. परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेने लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाड्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
मुंबईतील महालक्ष्मी मंदिराजवळ शनिवारी (१९ एप्रिल २०२४) एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दोन्ही मुली जखमी झाल्या. त्यांना त्वरीत नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुली रस्ता ओलांडताना दिसत आहेत. त्याच क्षणी पिवळ्या रंगाच्या एका भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली आणि दोन्ही मुली रस्त्यावर खाली पडण्यापूर्वी हवेत उंच फेकल्या गेल्या. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.