Pune Phoenix Market city Mall Fire: पुण्यातील (Pune) विमाननगर (Viman Nagar) परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलच्या (Phoenix Market city Mall) वरच्या मजल्यावर आज (१९ एप्रिल २०२४) दुपारी आग लागली. या घनटेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या, दोन वॉटर टँक आणि एक ब्रॉन्टो घटनास्थळी रवाना झाल्या. फिनिक्स मार्केट सिटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे, जे कोरोना महामारीच्या काळापासून बंद होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४० ते ५० जवानांनी कर्तव्य बजावले.
मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या गिरनार गॅलेक्सी बिल्डिंगला मंगळवारी (१६ एप्रिल २०२४) संध्याकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत एकूण ११ जण होरपळल्याची माहिती आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. इमारतीला आग कशी लागली? त्याची कारणे अद्याप कळू शकलेली नाही.
पुणे शहरातील पेठ परिसरात मंगळवारी दुपारी दोन मजली क्लस्टर स्ट्रक्चरला आग लागली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
संबंधित बातम्या