मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वरिष्ठ नेत्यांच्या धाकामुळं आम्ही आख्खं मंत्रिमंडळ बदललं; दानवेंनी सांगितली 'अंदर की बात'

वरिष्ठ नेत्यांच्या धाकामुळं आम्ही आख्खं मंत्रिमंडळ बदललं; दानवेंनी सांगितली 'अंदर की बात'

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 26, 2022 04:43 PM IST

Raosaheb Danve : आम्हाला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचा धाक आहे. सरकारी काम दिलं तर तेच करावं लागतं, असाही खुलासा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंनी केला आहे.

Raosaheb Danave On Gujrat Cabinet
Raosaheb Danave On Gujrat Cabinet (HT)

Raosaheb Danve On Gujrat Cabinet : भारतीय जनता पार्टीमध्ये काहीही होऊ शकतं, वरिष्ठांच्या धाकामुळं आम्ही गुजरातमधील अख्खं मंत्रिमंडळच बदलून टाकलं, असा खळबळजनक खुलासा भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळं दानवेंच्या या विधानानं राजकीय चर्चांना उधान आलं आहे. याशिवाय दानवेंनी पक्षाच्या आतली गोष्ट सांगितल्यानं अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या काही दिवसांत गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यासाठी भाजपनं मंत्रिमंडळात बदल केला असून विधानसभा निवडणुकीत २५ टक्के जागांवर नवीन उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यावर औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, आम्हाला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचा धाक आहे. जे सरकारी काम दिलं जातं तेच आम्हाला करावं लागतं. वरिष्ठांच्या धाकामुळंच आम्ही गुजरातमधील मंत्रिमंडळ बदललं. भाजपमध्ये काहीही होऊ शकतं, असं ते म्हणाले. त्यामुळं आता दानवेंच्या विधानानं राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं भाजप आणि शिवसेनेच्या हाती सत्ता सोपवली होती. परंतु उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करत आम्हाला धोका दिला. परंतु त्यांनी दिलेला धोका हा काही भाजपलाच नव्हता तर तो जनतेच्या मताशी केलेला विश्वासघात होता. त्यामुळं त्याची खदखद शिवसेनेच्या आमदारांमध्ये होती. त्यामुळंच त्यांनी बंड करत जनतेच्या मनातलं सरकार आणलं, राजकारणात बहुमताला महत्त्व असतं, असं म्हणत दानवेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीनं भाजपनं गुजरातमध्ये राजकीय समीकरणं जुळवायला सुरुवात केली आहे. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटलं आहे. त्यामुळं गुजरातमध्ये भाजप, कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत होताना दिसणार आहे.

IPL_Entry_Point