मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या; धक्कादायक घटनेनं नागपुरात खळबळ

भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या; धक्कादायक घटनेनं नागपुरात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 18, 2023 05:34 PM IST

Nagpur Crime News : शेगावला जाऊन येतो, असं पत्नीला सांगून निघालेल्या अविनाश यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्यामुळं नागपुरात शोककळा पसरली आहे.

Nagpur Crime News Marathi
Nagpur Crime News Marathi (HT_PRINT)

Nagpur Crime News Marathi : बँकेच्या संचालकांनी भ्रष्टाचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत भाजप नेत्या नयना मनतकार यांचे पती अविनाश मनतकार यांनी नागपुरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नयना मनतकार या अकोला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आणि महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आहे. मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून त्यांच्या पतीनं आत्महत्या केल्याचं उघड झालं असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नयना मनतकार यांचे पती अविनाश मनतकार यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात मनतकार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदारांसह पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी मनतकार यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी माजी आमदार चैनसुख संचेती यांना जबाबदार धरलं आहे. मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारात संचेती आणि लखाणी यांनी आपल्याला फसवल्याचं मनतकार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणात कोणतीच मदत न करता ३८ लाख रुपये उकळल्याचंही त्यांनी चिठ्ठीत लिहिलेलं आहे. त्यामुळं आता अविनाश मनतकार यांच्या आत्महत्येनंतर मलकापूर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

अविनाश मनतकार हे तेल्हाऱ्यातील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. मलकापूर अर्बन बँकेत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मनतकार दाम्पत्य नागपुरात आले होते. त्यानंतर अविनाश यांनी नयना यांना शेगावला जाऊन येतो, असं सांगत राजधानी एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केली. अनेकदा फोन करूनही अविनाश यांचा संपर्क होत नसल्यामुळं त्यांच्या पत्नी नयना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अविनाश यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं. अविनाश यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

IPL_Entry_Point