Amravati mangaldham double murder : अमरावतीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जागेच्या वादातून एका शेजाऱ्याने आई आणि मुलाची भरदिवसा कोयत्याने हत्या केली. आरोपीने शेजाऱ्यावर देखील कोयत्याने हल्ला केला असून या घटनेत संबंधित व्यक्ति हा थोडक्यात बचावला आहे. हत्या केल्यावर आरोपी हा पत्नी मूलासह दुचाकीवरून फरार झाला आहे. ही घटना सोमवारी शहरातील मंगलधाम येथील बालाजी नगर येथे घडली. आरोपी जेव्हा शेजऱ्याला मारत होता तेव्हा परिसरातील नागरिक हा सर्व प्रकार पाहत होते. मात्र, कुणाचीही बोलण्याची हिंम्मत झाली नाही.
कुंदा देशमुख (वय ६५), सुरज देशमुख (वय २५) अशी हत्या झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. तर वडिल विजय देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. तर देवानंद लोणारे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटणस्थळाचा पंचनामा करून आरोपीला अटक करण्यासाठी पथक पाठवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजीनगर येथे देशमुख कुटुंब अनेक वर्षांपासून राहत होते. विजय देशमुख, कुंदा देशमुख, मोठा मुलगा अंकुश व लहान मुलगा सुरज असे सर्व जण घरात राहत होते. सुरज हा अमरावतीच्या एका कंपनीत नोकरीला होता. सोमवारी त्याला सुट्टी असल्याने सर्व जण घरीच होते. आरोपी देवानंद लोणारे याने देशमुख यांच्या घरामोर घर खरेदी केले होते. त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेत कचरा टाकन्यावरून दोघांमध्ये वाद होता.
दरम्यान, सोमवारी देशमुख कुटुंबीय हे घरी होते. लोणारे याने रिकाम्या जागेवरून देशमुख यांना मोठ मोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बाहेर सुरू असलेल्या गोंधळाचा आवाज ऐकून कुंदा देशमुख या घरा बाहेर आल्या. यावेळी लोणारे याने कुंदा यांना पाहिले. त्याचा राग अनावर झाल्याने लोणारे घरात जात त्याने कोयता आणून कुंदा देशमुख यांच्या डोक्यात वार केले. हा वार वर्मी बसल्याने कुंदा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, आई कुंदा यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने सुरज बाहेर आला. यावेळी लोणारे याने त्यांचा डोक्यावर देखील वार केले. दरम्यान, मुलगा आणि पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून विजय देशमुख त्यांना वाचवण्यासाठी बाहेर धावले असता लोणारे याने त्यांच्यावर देखली वार केले. भांडणाच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती. यामुळे लोणरे याने पुन्हा कुंदा आणि सुरजवर ववार केले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी लोणारे हा जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात पत्नी व मुलाला दुचाकीवर घेऊन फरार झाला.
ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्रेजरपुरा पोलीस पुढील तपास करत आहेत.
संबंधित बातम्या