Mumbai North West Lok Sabha Constituency : जोगेश्वरी येथील एका भूखंड प्रकरणात मुंबई महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी अडचणीत आलेले व नंतर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी होणार आहे.
महायुतीच्या जागावाटपात मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेकडं आला आहे. तिथं कोणाला उमेदवारी द्यायची यावरून बरेच दिवस खलबतं सुरू होती. अभिनेता गोविंदापासून अनेकांची नावं चर्चेत होती. मात्र, ती मागे पडली. आता वायकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.
रवींद्र वायकर हे काही दिवसांपूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. नगरसेवकपदापासून आमदारकीपर्यंत शिवसेनेत त्यांचा चढत्या क्रमानं प्रवास झाला होता. अनेक वर्षे ते मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी होते. सध्या ते जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.
जोगेश्वरी येथील भूखंडावर क्रीडा विषयक उपक्रम राबवण्याचा करार वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या सोबत केला होता. महाविकास आघाडीचं (MVA) सरकार सत्तेवर असताना ही परवानगी देण्यात आली होती. मात्र, वायकर यांनी तिथं हॉटेल उभारलं. त्यामुळं महापालिकेचं ५०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप होता. सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडाचा वापर हॉटेल बांधण्यासाठी केल्याप्रकरणी वायकर यांना नोटीस बजावण्यात आली होती.
आर्थिक गुन्हे शाखेनं याच प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनं वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार आसू निहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. वायकर यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापेही पडले होते. कालांतरानं वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता.
संबंधित बातम्या