मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hapus Mango Price : गुढीपाडव्यानिमित्त वाशीच्या APMC मार्केटमध्ये आंब्याची विक्रमी आवक, काय होता डझनाचा दर?

Hapus Mango Price : गुढीपाडव्यानिमित्त वाशीच्या APMC मार्केटमध्ये आंब्याची विक्रमी आवक, काय होता डझनाचा दर?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 09, 2024 04:32 PM IST

Hapus Mango Price : वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात ५० हजार पेट्या आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. याचा दर प्रति डझन ३०० ते ८०० रुपये होता.

वाशीच्या  APMC मार्केटमध्ये आंब्याची विक्रमी आवक
वाशीच्या  APMC मार्केटमध्ये आंब्याची विक्रमी आवक

वाशीच्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये यावर्षी जानेवारी महिन्यापासून आंब्याची आवक सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यातही आंब्याची विक्रमी आवक झाली होती. यावर्षी अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसला आहे. मात्र यंदाच्या हंगामातील हापूस आंबा एपीएमसी मार्केटमध्ये यायला सुरूवात झाली आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने (gudi padwa) वाशीच्या एपीएमसी (Agriculture Produce Market Committee) बाजारात आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

आज बाजारात ५० हजार पेट्या आंब्याची आवक झाली आहे. गेल्यावर्षी २५ हजार पेट्या गुढीपाडव्याला दाखल झाल्या होत्या. यंदा आंब्याची आवक दुप्पट झाली आहे, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली आहे.

वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातही यंदा आंब्यांच्या ५० हजार पेट्याची विक्रमी आवक झाली आहे. मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने आंब्याचे डझनाचे दरही उतरले होते. ३०० ते ८०० रुपये डझन दराने (Hapus Mango Price) आंबे विकले जात होते. 

दर कमी असल्याने सणासुदीला आंबे खवय्यांसाठी ही पर्वणी ठरली आहे. यंदा गुढीपाडव्यादिवशी आंब्यासोबतच विदेशी फळांना देखील मागणी वाढली आहे. वाशी फळ बाजारात रत्नागिरी, देवगड, राजापूर आणि बाणकोटमधून आंब्याची आवक झाली आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यातही वाशीच्या बाजार समितीमध्ये ३६० पेट्यांची विक्रमी आवक झाली होती. त्यावेळी पेटीला गुणवत्तेनुसार ७ हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे. कोकणातील हापूसच्या सीझनची फेब्रुवारीपासून सुरुवात होते. मात्र दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची २५ ते ३० पेट्यांची आवक होत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात वाशी बाजारात हापूसच्या विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली होती. जानेवारीतील आवक इतिहासातील सर्वोच्च अशी विक्रमी आवक असल्याचे व्यापारी पानसरे यांनी सांगितले. कोकणातील रत्नागिरी अन् देवगडचा हापूस राज्य व देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. यामुळे युरोपातील बाजारातही त्याला चांगली मागणी असून दरही चांगली मिळत आहे. 

IPL_Entry_Point