Who Is Nupur Shikhare: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान ही बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत ३ जानेवारीला लग्न बंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाचे विधी आता सुरू झाले आहेत. आज नुपूर आणि आयरा यांचा हळदी विधी पार पडला. सध्या सोशल मीडिया आणि मीडियामध्ये आमिर खानच्या लेकीची आणि त्याच्या होणाऱ्या जावयाची चर्चा सुरू आहे. आमिर खानचा होणारा जावई कोण? त्याचं शिक्षण किती झालंय? त्याची कमाई किती? याची माहिती जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. चला तर, जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी...
आमिर खानचा होणारा जावई नुपूर शिखरे याचा जन्म पुण्यात झाला आहे. तर, तो लहानाचा मोठा मुंबईत झाला आहे. त्याने मुंबईतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने मुंबईतील महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तर, आयरा खानने तिचे शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. यानंतर तिने नेदरलँडमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नुपूर शिखरे हा इंडस्ट्रीमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून सक्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नुपूर शिखरे बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा वैयक्तिक ट्रेनर म्हणून काम करत होता. याशिवाय नुपूर फिटनेस एक्स्पर्ट आणि कन्सल्टंट आहे.
आमिर खानच्या घरीच नूपूर आणि आयरा यांची पहिली ओळख झाली होती. लॉकडाऊन दरम्यान, आयरा खान तिच्या वडिलांच्या घरी म्हणजेच आमिर खानच्या घरी राहण्यासाठी गेली होती. याच ठिकाणी तिची नुपूरशी भेट झाली. त्यावेळी नुपूर आमिरचा फिटनेस कोच म्हणून काम करत होता. त्यावेळी आयराने देखील फिटनेस ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली होती. हळूहळू नुपूर आणि आयरा यांची मैत्री झाली. तर, काही दिवसांनी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आयराने २०२१ मध्ये तिच्या या नात्याचा खुलासा केला होता.
नूपुर आणि आयरा दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. दोघेही एकत्र खूप क्युट दिसतात. आयरा आणि नुपूर यांनी गतवर्षी १८ नोव्हेंबरला साखरपुडा केला होता. आता दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. नुपूर आणि आयराच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. आमिर खानच्या दोन्ही माजी पत्नी म्हणजेच रीना दत्ता आणि किरण राव या लग्नासाठी नऊवारी नेसून सजल्या आहेत.