Sunil Grover Sunflower Season 2: 'गुत्थी' साकारून सगळ्या प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. सुनील ग्रोव्हर याच्या 'सनफ्लॉवर' या वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सनफ्लॉवर' या वेब सीरिजचा पहिला सीझन तीन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. यानंतर आता त्याच्या या सीरिजचा दुसरा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता सुनील ग्रोव्हर याच्यासोबत अनेक गाजलेले कलाकार झळकणार आहेत.
'सनफ्लॉवर' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये सुनील ग्रोव्हरसोबत अभिनेते आशिष विद्यार्थी, रणवीर शौरी, मुकुल चड्ढा आणि गिरीश कुलकर्णी हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 'सनफ्लॉवर' हा एक क्राईम कॉमेडी शो आहे. या सीरिजची कथा मुंबईतील सनफ्लॉवर नावाच्या एका मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थेभोवती फिरते. या शोमध्ये अनेक आगळ्यावेगळ्या स्वभावाच्या पात्रांची कथा पाहायला मिळणार आहे. सुनील ग्रोव्हरची वेब सीरिज 'सनफ्लॉवर' ही एक मर्डर मिस्ट्री सीरिज आहे. या सीरिजमधून डार्क ह्युमर दाखवला गेला आहे. दिग्दर्शक विकास बहल यांनी या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले होते.
'सनफ्लॉवर'च्या सीझन २चा टीझर काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरमध्ये दाखवण्यात आले होते की, सुनील ग्रोव्हरला अर्थात सोनूला पोलिसांनी पकडले असून, सोसायटीत झालेल्या हत्या प्रकरणात सोनू संशयाच्या भोवऱ्यात आहे. या नवीन सीझनबद्दल विकास बहल देखील खूप उत्साहित आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘सनफ्लॉवरच्या पहिल्या सीझनला चाहत्यांकडून मिळालेले अफाट प्रेम आणि पाठिंबा पाहून मी खरोखरच आनंदी झालो आहे. सुनील ग्रोव्हरचा सोनू सिंह प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे त्याचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. दुसऱ्या सीझनमध्ये देखील प्रेक्षकांना अशीच रोलरकोस्टर राईड मिळणार आहे.’
सुनील ग्रोव्हरच्या 'सनफ्लॉवर'चा दुसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, दुसऱ्या सीझनची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या