Vijay Deverakonda: साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी विजय देवरकोंडा याचा ‘लायगर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘लायगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. आता या चित्रपटामुळे अभिनेता विजय देवरकोंडा देखील अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाच्या फंडिंगवरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने विजयची चौकशी केली. यानंतर आता विजयच्या वडिलांनी देखील त्याची शाळा घेतली आहे.
नुकतेच विजय देवरकोंडाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये विजय आणि त्याने वडील घरच्या गच्चीवर बसून थंड हवेचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र, यावेळी विजयने दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात त्याने म्हटलं की, ‘सुंदर हवामान आणि बाबा नेहमीप्रमाणे शाळा घेताना...’. दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अर्थात विजय गंमतीनेच असं म्हणाला आहे. बाप-लेकाची जोडी छान चहा-कॉफी पीत गारव्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
विजय देवरकोंडाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्याचा आणि त्याच्या वडिलांचा स्वॅग दिसत आहे. ईडीच्या चौकशीनंतर विजय देवरकोंडा काही काळ सोशल मीडियावरून गायब झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर परतला आहे. यानंतर त्याने वडिलांसोबत आपला फोटो शेअर केला आहे. ‘लायगर’ हा विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट होता. मात्र, तो सपाटून आपटला.
‘लायगर’ चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा ही जोडी झळकली होती. प्रदर्शनाआधी या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ आपली जादू दाखवू शकला नाही. यानंतर चित्रपटाच्या फंडिंगवरून वाद निर्माण झाला. या प्रकरणी अभिनेता विजय देवरकोंडा याची तब्बल १२ तास चौकशीही करण्यात आली.