Bharat Jadhav Birthday Special: ‘गोडगोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी..’ हे गाणं कुठेही ऐकू येऊ दे डोळ्यांसमोर पहिला चेहरा येतो तो म्हणजे अभिनेता भरत जाधव. रंगभूमी असो वा मालिका किंवा चित्रपट, तीनही क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणून भरत जाधव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना खळखळवून हसवले. मराठी मनोरंजन विश्वात सर्वाधिक मानधन मिळवणारा आणि स्वतःची व्हॅनिटी व्हॅन असणारा पहिला अभिनेता म्हणूनही भरत जाधव यांचं नाव घेतलं जातं.
प्रचंड संघर्ष करून भरत जाधव यांनी आपल्या करियरमध्ये यशाचं शिखर गाठलं. मुंबईतल्या एका चाळीत १२ डिसेंबर १९७३ रोजी भरत जाधव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. भरत जाधव यांचे बालपण लालबाग परळच्या एका छोट्याशा चाळीत गेले. त्यांचे वडील भाड्याने टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या चाळीच्या जवळच राजाराम स्टुडीओ होता. इथूनच त्यांच्यात अभिनयाची गोडी निर्माण झाली होती. भरत जाधव ज्या चाळीत राहायचे त्या चाळीचे मालक व्ही. शांताराम होते. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य त्यांना बालपणीच लाभलं.
भरत जाधव यांना आणखी दोन भाऊ आहेत. तीन भाऊ आणि आई-वडील हे संपूर्ण कुटुंब वडिलांच्या मिळकतीवर आपला उदार्निरवाह करत होतं. मात्र, मोठे झाल्यावर तिन्ही भावडांनी पैसे जमवून वडिलांना स्वतःची टॅक्सी घेऊन दिली. या दरम्यान भरत जाधव देखील छोटी-मोठी कामं करत होते. अभिनयाची आवड असणाऱ्या भरत यांना पहिली संधी शाहीर साबळे यांनी दिली. १९८५मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात त्यांना पहिली संधी मिळाली. याच ठिकाणी भरत जाधव यांनी अभिनयातील बारकावे शिकून घेतले. यानंतर ‘ऑल द बेस्ट’ या नाटकामुळे भरत यांच्या कारकिर्दीला एक वेगळी कलाटणी मिळाली. त्यानंतर आलेल्या ‘सही रे सही’ या नाटकाने यशाचं शिखर गाठलं.
‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘सही रे सही’ या नाटकांसोबतच ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘खबरदार’, ‘पछाडलेला’, ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘गलगले निघाले’, ‘साडे माडे तीन’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘क्षणभर विश्रांती’ यासारख्या चित्रपटांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. या दरम्यान त्यांनी ‘भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लि.’ची स्थापना करत स्वतःची व्हॅनिटी व्हॅनदेखील खरेदी केली. मात्र, आज किती गाड्या दाराशी असल्या तरी त्यांच्या आयुष्यात टॅक्सीला विशेष महत्त्व असल्याचे ते म्हणतात.
संबंधित बातम्या