मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ब्रेन स्ट्रोकमुळे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अंथरुणाला खिळला; चाहत्यांकडे केलं आर्थिक मदतीचं आवाहन

ब्रेन स्ट्रोकमुळे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अंथरुणाला खिळला; चाहत्यांकडे केलं आर्थिक मदतीचं आवाहन

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 12, 2022 08:08 AM IST

Dr. Vilas Ujawane : ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत असतानाच आता विलास उजवणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. यासाठी त्यांच्यावर एक मोठे ऑपरेशन करावे लागणार आहे.

Dr Vilas Ujawane
Dr Vilas Ujawane

Dr. Vilas Ujawane : आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजन विश्व गाजवणारे अभिनेते डॉ. विलास उजवणे हे सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’ या सारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले डॉ. विलास उजवणे सध्या ब्रेन स्ट्रोकमुळे अंथरुणावर आहेत. सहा वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. यावर अनेक उपचार घेऊन, त्यांनी याच वर्षी आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा एकदा त्यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आता चाहत्यांकडे मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत असतानाच आता विलास उजवणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. यासाठी त्यांच्यावर एक मोठे ऑपरेशन करावे लागणार आहे. तर, यातच त्यांना कावीळची लागण देखील झाली आहे. या सगळ्या उपचारांसाठी त्यांनी आपली आयुष्यभराची मिळकत खर्च केली. मात्र, आता पुढील उपचारांसाठी त्यांनी चाहत्यांकडे मदतीचे आवाहन केले आहे. या संदर्भातील एक पोस्ट अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये डॉ. विलास उजवणे यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे. तर, त्यांच्यावतीने आर्थिक मदतीचे आवाहन देखील करण्यात आले आहे. शरद पोंक्षे यांनी आपल्या अकाऊंटवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘डॉ. विलास उजवणे हा राजा माणूस म्हणजे आमचा लाडका डॉक्टर मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेली सहा वर्षे ब्रेन स्ट्रोकशी झुंज देणाऱ्या हा वाघ थोडा थकला आहे. अत्यंत साध्या सदनिकेत राहणारा हा कलाकार आपल्या आयुष्याची सर्व पुंजी या आजारांमध्ये खर्च करून बसला आहे आणि ती रक्कम थोडी थोडकी नाही. चांगली सुधारणा होत आहे असे वाटत होते, बाहेर पडत होते, कुठे परीक्षक तर, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून त्याच्या चाहत्यांना दिलासा देत होते. लवकरच हे आपली सेकंड इनिंग चालू करणार असे वाटत असताना नियती त्यांच्या पुढे दोन मोठ्या आजारांचे निष्ठुर दान टाकून निघून गेली.’

‘ह्रदयविकाराचा त्रास झाला असून, त्यांचे मोठे ऑपरेशन तातडीने करणे अत्यावश्यक आहे. त्यात भरीला एक वेगळ्या काविळीची भर पडली आहे. ही कावीळ लाखोकरोडो लोकांमधे एखाद्यास होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील इतर ऑर्गनसवर वाईट परिणाम होत आहे. या कारणामुळे छोटी इस्पितळे त्यांना दाखल करत नाही. कोल्हापूरच्या इस्पितळात होते. पण परत यावे लागले. आता एकच उपाय मुंबई मधील मोठे हॉस्पिटल! तिथेच हे शक्य आहे. त्यामुळे खुपसा खर्च डोळ्यासमोर आ वासून उभा आहे. डॉक्टरजवळ असलेली गंगाजळी फारच त्रोटक आहे त्यात जवळ असलेल्या मेडिक्लेम व इतर पॉलिसी देखील संपुष्टात आल्या आहेत. गेली सहा वर्षे आजारात आणि जवळ काम नाही त्यात हे नवीन आजार. तेव्हा या चक्रव्युहातून या अभिमन्यूची सुटका होण्यासाठी आपण सर्व मित्रांनी खारीचा का होईना वाटा उचलू. डॉक्टरांच्या वेदना आपण नाही घेऊ शकत पण प्रेमाची आर्थिक मदत आपण सर्वजण नक्कीच करू शकतो मित्रानो!’, असे मदतीचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point