Shivani Surve New Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री नुकतीच अजिंक्य ननावरे याच्यासोबत लग्न बंधनात अडकली आहे. या लग्न सोहळ्यामुळे शिवानी सुर्वे चर्चेत असताना आता तिने चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. लग्नानंतर आता अभिनेत्री नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवानी सुर्वे हिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘ऊन सावली’ असून, या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘ऊन सावली’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताला देखील प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता ‘ऊन सावली’ या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर लाँच करण्यात आले आहे. ऊनामुळे लागणारे चटके आणि सावलीचा थंडावा अशी प्रेमाची दोन्ही रूपं यात पाहायला मिळणार आहे. ‘आम्ही दोघी’, ‘टाईमपास २’ फेम अभिनेता भूषण प्रधान आणि त्याच्यासोबत ‘वाळवी’, ‘झिम्मा २’ असे बॅक टू बॅक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे ही नवीकोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांसाठी प्रेमाचा आगळा वेगळा आनंद देणारा, हळुवार स्पर्श करणारा असा हा चित्रपट असणार आहे.
'ऊन सावली' या चित्रपटामध्ये प्रणय आणि आन्वी यांची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. प्रणयला लग्न करायचं नाही, तर, त्याच्यासाठी पत्नी म्हणून निवडण्यात अन्वीलाही लग्न करायचं नाही. पण, हे ते तिच्या आईला सांगू शकत नाही. ते दोघेही त्यांच्या पालकांच्या मनाचा विचार करतात आणि या लग्नाला होकार देतात. त्यांच्या आयुष्यात एक दिवस असा क्षण येतो, जेव्हा अन्वी आणि प्रणय त्यांच्या कुटुंबियांसोबत एकमेकांना भेटतात, तेव्हा प्रणयला पहिल्या नजरेतच ती आवडते. परंतु, अन्वीचा लग्नाला असलेला विरोध कायम आहे. आता त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘तिकीट विंडो पिक्चर्स’ या बॅनर अंतर्गत समीर शेखद्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा अभय वर्धन यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे. ‘ऊन सावली’ या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तसेच, या चित्रपटात अजिंक्य ननावरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शिवानी सुर्वे आणि भूषण प्रधान यांचा हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.