OTT Release This Week: ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यातही नवीन आणि वेगवेगळ्या धमाकेदार वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कोरियन ड्रामा, क्राईम, थ्रिलरपासून ते काल्पनिक साहसापर्यंत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्म सज्ज झाले आहेत. जर, तुम्हालाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज पाहण्याची आवड असेल, तर आमची ही नव्याने रिलीज होणाऱ्या वेब सीरिजची यादी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या यादीमध्ये १९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान अर्थात या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिजची नावे आणि त्या कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येतील, याचा तपशील आहे.
'अवतार द लास्ट एअरबेंडर' ही वेब सीरिज २२ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना ही अमेरिकन ॲनिमेटेड, कल्पनारम्य आणि थ्रिलर वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या धमाकेदार सीरिजचे एकूण आठ भाग प्रदर्शित होणार आहेत.
कोरियन थ्रिलर शो ‘अपार्टमेंट ४०४’ देखील या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. हा कोरियन शो २४ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अशा एका अपार्टमेंटची कथा दाखवण्यात येणार आहे, जिथे सतत अलौकिक घटना घडत राहतात. यात राहणारे सहा रहिवाशी यामागील सत्य शोधून काढतात.
‘पोचर’ ही हिंदी वेब सीरिज येत्या २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सध्या चर्चेत असलेली ही वेब सीरिज प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. आलिया भट्टची ही वेब सीरिज हस्तिदंत तस्करीवर आधारित आहे. यात आलियासोबत निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्या मुख्य भूमिका आहेत.
अनेक धमाकेदार वेब सीरिज सोबतच या आठवड्यात एक डॉक्युमेंटरी सीरिजही रिलीज होणार आहे. ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी- बरीड ट्रुथ’ ही डॉक्युमेंटरी सीरिज नेटफ्लिक्सवर २३ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. यामध्ये मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरण दाखवण्यात येणार आहे. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीवर तिच्याच मुलीच्या हत्येचा आरोप लावण्यात आला आहे.