Prajakta Mali New Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची आणि चर्चित अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्राजक्ता माळी लवकरच ‘भिशी मित्र मंडळ’ सुरू करणार आहे. आता तिची ही ‘भिशी मित्र मंडळ’ एखादी संस्था किंवा गट नसून, तिचा आगामी धमाल चित्रपट आहे. कॉमेडी, धमाल आणि निखळ हास्याचा धबधबा असणारे एक जबरदस्त कथानक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच प्राजक्ता माळी हिने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिये मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सध्या अग्रक्रमी आहे. आजवर अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती ‘भिशी मित्र मंडळ’ या हटके चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. ‘भिशी मित्र मंडळ’ असे तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव असून, नुकताच पुण्यात चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला आहे. या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याला अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत ‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटाचे निर्माते, प्रस्तुतकर्ते, लेखक, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीम उपस्थित होती.
‘भिशी’ म्हटलं की डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. ‘भिशी’च्या संकल्पनेत एका ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून, काही चिठ्ठ्या उडवून त्यातून एक नाव निवडून त्या सदस्याला सगळे पैसे दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. याच ‘भिशी मित्र मंडळा’चं धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे.
अमोल कागणे आणि शरद पाटील हे ‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर, किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच पुणे येथे सुरू होणार आहे. संजीवकुमार चंद्रकांत हिल्ली हे या चित्रपटासाठी सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत.