Ashok Saraf Award: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नुकताच अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर आता संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने अशोक सराफ यांचा गौरव होणार आहे. नुकतीच संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात अशोक सराफ यांना देखील पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहे. तब्बल पाच दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्वात देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. भूमिका कोणतीही असो, अशोक मामांनी नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची अशी वेगळी छाप सोडली आहे. नाट्यक्षेत्रातील या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना आता ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले आहे. मराठी मनोरंजन विश्वासोबतच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते अशोक सराफ यांना ‘अभिनय सम्राट’ म्हटले जाते. मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अशोक सराफ यांनी तब्बल २५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनय कारकिर्दीपूर्वी अशोक सराफ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये काम करायचे. सुशिक्षित कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या वडिलांना त्यांना सरकारी नोकरी करताना पाहायचे होते. अशोक सराफ यांनी वडिलांचा आदेश पाळला आणि नोकरी देखील मिळवली. मात्र, अभिनयाचं वेड त्यांना बालपणापासूनच होतं. त्यामुळे नोकरीसोबतच अशोक सराफ रंगभूमीशी देखील जोडले गेले. यादरम्यान, आपल्या अभिनय कौशल्यात सुधारणा करण्याबरोबरच, अशोक सराफ यांनी नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच अशोक सराफ यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीलाही भरपूर वेळ दिला आहे. यादरम्यान अशोक सराफ यांनी अनेक मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.