Umesh Kamat Birthday: मराठी मनोरंजन विश्वातला 'चॉकलेट बॉय'; उमेश कामतचे 'हे' गाजलेले चित्रपट पाहिलेत?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Umesh Kamat Birthday: मराठी मनोरंजन विश्वातला 'चॉकलेट बॉय'; उमेश कामतचे 'हे' गाजलेले चित्रपट पाहिलेत?

Umesh Kamat Birthday: मराठी मनोरंजन विश्वातला 'चॉकलेट बॉय'; उमेश कामतचे 'हे' गाजलेले चित्रपट पाहिलेत?

Dec 12, 2023 08:14 AM IST

Happy Birthday Umesh Kamat: आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा मराठमोळा अभिनेता उमेश कामत याचा आज वाढदिवस आहे.

Happy Birthday Umesh Kamat
Happy Birthday Umesh Kamat

Happy Birthday Umesh Kamat: नाटक असो, मालिका असो, वेब सीरिज किंवा चित्रपट, प्रत्येक माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा मराठमोळा अभिनेता उमेश कामत याचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस आहे. उमेश कामत याला मराठी मनोरंजन विश्वातला 'चॉकलेट बॉय' देखील म्हटलं जातं. उमेश कामत हा तरुणींच्या गळ्यातील ताईत होता. त्याची मोठी फॅन फॉलोविंग आहे. उमेश कामत याने काम केलेले सगळेच चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भावलेले आहेत. चला तर, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहून उमेश कामतचे काही गाजलेले चित्रपट...

लग्न पाहावे करून

'लग्न पाहावे करून' या चित्रपटात अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही जोडी झळकली होती. हा चित्रपट लग्न जमवणाऱ्या एका संस्थेभोवती फिरणारा होता. आगळ्यावेगळ्या हटके पद्धतीने तरुण-तरुणींची लग्न या संस्थेतून जुळवण्याचा प्रयत्न नायक-नायिका करताना दाखवले आहेत. लग्नासाठी पत्रिका नव्हे, तर मन जुळायला हवं, हा त्यांचा उद्देश असतो. या चित्रपटातील गाणी देखील खूप गाजली होती.

टाईमप्लीज

२०१३मध्ये प्रदर्शित झालेला 'टाईमप्लीज' हा चित्रपट आजही प्रेक्षकांना भरपूर आवडतो. या चित्रपटात प्रिया बापट आणि उमेश कामत हीच जोडी झळकली होती. उमेश आणि प्रियासोबतच या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधव देखील होते. या चित्रपटाची कथा एका नव्यानेच लग्न झालेल्या जोडीभोवती फिरणारी आहे. त्यांच्यातील रोमान्स, वाद आणि दुरावा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता.

Bharat Jadhav Birthday: भरत जाधव यांनी का घेतला होता मुंबई सोडण्याचा निर्णय? कारण माहितीये का?

अ पेईंग घोस्ट

'अ पेईंग घोस्ट' या चित्रपटात उमेश कामत याच्यासोबत अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटात दोघांची क्युट लव्हस्टोरी पाहायला मिळाली होती. नुकत्याच लग्न झालेल्या या जोडीच्या घरात काही भूतं पाहुनी म्हणून राहायला येतात. या भुतांच्या येण्याने दोघांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, या भुतांना नक्की काय हवंय? असं हे कथानक सगळ्यांच्या मनाला भावणारं आहे.

ये रे ये रे पैसा

'ये रे ये रे पैसा' या धमाल विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळवून हसवले. या चित्रपटात उमेश कामत, तेजस्वीनी पंडित, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात एका चोरीची कथा दाखवण्यात आली होती. या दरम्यान घडणाऱ्या विनोदांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते.

बाळकडू

उमेश कामत याच्या 'बाळकडू' या चित्रपटात मराठी भाषेसाठीचा लढा पाहायला मिळाला. मराठी माणसाच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर लढाई लढली होती. त्यांच्या याच विचारांचे आचरण करणाऱ्या एका शिक्षकाची कथा 'बाळकडू' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच हा शिक्षक देखील मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यासाठी लढताना दिसला आहे.

Whats_app_banner