Happy Birthday Rajinikanth: ना देखणा लूक, ना पिळदार शरीरयष्टी, ना गोरागोमटा चेहेरा... तरीही आपल्या जादूने त्यांनी अवघ्या मनोरंजन विश्वावर सत्ता गाजवली. हो.. हे नाव म्हणजे सुपरस्टार 'थलायवा' रजनीकांत. केवळ साऊथच नव्हे, तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये देखील रजनीकांत यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. आजघडीला रजनीकांत यांना 'थलायवा' म्हटले जाते. मात्र, मनोरंजन विश्वाचा हा प्रवास त्यांच्यासाठी फारच कठीण होता. इथवर पोहोचण्यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला. त्यांनी बालपणापासूनच अतिशय खडतर काळ पाहिला आहे. रजनीकांत यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. मात्र, त्यांचा हा प्रवास अतिशय संघर्षाने भरलेला होता.
अभिनेते रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी एका मराठी कुटुंबात झाला होता. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. रजनीकांत यांना ४ भावंडं होती. रजनीकांत हे त्यांच्यात सगळ्यात लहान होते. त्यांचे वडील पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल होते. रजनीकांत लहान असतानाच त्यांचं मातृछत्र हरपलं होतं. रजनीकांत यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी फार कमी वयातच काम करायला सुरुवात केली होती. आधी त्यांनी एका ठिकाणी 'ऑफिस बॉय' म्हणून कामाची सुरुवात केली. त्यानंतर 'कुली' बनून ते रेल्वे स्टेशनवर हमाली करायला लागले होते.
पण, यातून त्यांना फारसे पैसे मिळत नव्हते. घरगाडा हाकताना त्यांना प्रचंड मेहनत करावी लागत होती. अधिकच्या पैशाची गरज असल्याने रजनीकांत यांनी सुतार काम करण्यास सुरुवात केली होती. अखेर अथक प्रयत्नानंतर त्यांना बस कंडक्टरची नोकरी मिळाली. कंडक्टर म्हणून नोकरी करत असताना रजनीकांत यांच्या तिकीट विकण्याच्या आणि शिट्ट्या वाजवण्याच्या शैलीने सगळेच प्रवासी मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांची ही स्टाईल सगळ्यांमध्येच लोकप्रिय झाली होती. घर चालवण्यासाठी जरी ते काम करत असले, तरी रजनीकांत यांचा नेहमीच मनोरंजनविश्वाकडे कल होता.
बस कंडक्टर म्हणून काम करताना त्यांनी आवड म्हणून कन्नड थिएटरमध्ये देखील काम करायला सुरुवात केली होती. यानंतर, त्यांनी १९७३मध्ये मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. रजनीकांत यांनी वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. 'अपूर्व रागनागल' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री श्रीविद्या यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. यानंतर रजनीकांत यांना १९७८मध्ये 'भैरवी' या तमिळ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटातून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि रजनीकांत एकामागून एक सुपरहिट चित्रपट देत राहिले. आगळ्यावेगळ्या शैलीने आणि दमदार अभिनयाने रजनीकांत बघता बघता साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार बनले. रजनीकांत अध्यात्माशीही संबंधित आहेत. कोणताही नवा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी किंवा काम पूर्ण केल्यानंतर शांतता मिळवण्यासाठी ते काही दिवस हिमालयात जाऊन राहतात.
संबंधित बातम्या